लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर:' लस खरेदीसाठी
मुंबईप्रमाणेच अहमदनगर महानगरपालिकेनेही ग्लोबल निविदा काढावी. नगरसेवक निधीतून लस
खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा,' अशी मागणी
नगर शहराचे आमदार संग्राम
जगताप यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांना त्यांनी यासंबंधी पत्र दिले आहे. राष्ट्रवादी
काँग्रेसचे नगरसेवक आपल्या निधीतून लस खरेदी करण्यासाठी तयार आहेत, अन्य पक्षाचे नगरसेवक तयार असतील तर त्यांनाही हा निधी उपलब्ध करून द्यावा,
अशी मागणीही आमदार जगताप यांनी केली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी लसींचा तुडवडा भासत
असताना नगर शहरातही हीच स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून
आरोग्य कर्मचारी आणि नगरसेवकांनाही रोषाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर
आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना यांना पत्र पाठविले आहे.
या पत्रात संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे
की, ‘नगर शहरात मोठ्या
प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. मृत्यू दरही वाढलेला होता. त्यामुळे
शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले होते. अहमदनगर शहरात मोठ्या
प्रमाणात महानगरपालिकेमार्फत लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. पण शहराची लोकसंख्या पाहता उपलब्ध होणारी लस
अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना
नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
'आमदार निधीही लस खरेदीसाठी देणार'
संग्राम जगताप यांनी लस खरेदीसाठी
महापालिकेला आवाहन करत असताना स्वत:चा आमदार निधीही या कामासाठी देणार असल्याचं
सांगितलं आहे. ' सध्याच्या
परिस्थितीत इतर कामांपेक्षा नागरिकांचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. यासाठी
प्रशासनाकडूनही पुरेपूर उपाययोजना केल्या जात आहेत. लस उपलब्ध करण्यासाठी अहमदनगर
महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर लसीचे १५ लाख डोस खरेदी करण्यासाठी
ग्लोबल ई-निविदा प्रसिद्ध कराव्यात. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व या प्रस्तावाला
अन्य पक्षातील नगरसेवक अनुकूल असल्यास त्यांच्याही नगरसेवक निधीतून लस खरेदी
करण्याबाबत निधी उपलब्ध करून घेण्यात यावा.
याशिवाय आमदार म्हणून सरकारकडून आपल्याला करोना उपाययोजनांसाठी जो निधी मिळाला आहे, तोही आपण लस खरेसाठी उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे शहराची लोकसंख्या विचारात घेता प्रत्येकाला दोन डोस देण्यासाठी १५ लाख डोस आवश्यक आहेत. ते खरेदी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शन घेऊन डोस खरेदीची ग्लोबल ई-निविदा प्रसिद्ध करण्यात यावी,’ अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.
0 टिप्पण्या