लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
औरंगाबाद: करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'ब्रेक द चेन' अंतर्गत लॉकडाउन लागू
केला आहे. संचारबंदीही लागू केली आहे. औरंगाबादमध्ये लॉकडाउनची अंमलबजावणी करताना
सर्वांना सारखे नियम लावा, त्यात भेदभाव करू नका, अशी मागणी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली.
चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यात त्यांनी
म्हटले आहे की, 'लॉकडाउनचे
कठोर नियम लावताना भेदभाव केला जात आहे. शहराच्या काही भागातच त्याची अंमलबजावणी
होताना दिसते. शहराच्या काही भागातील व्यापारी व प्रतिष्ठानांवर दंडात्मक कारवाई
केली जात आहे, दुकाने सील केली जात आहेत. त्यामुळे
व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शहराच्या विशिष्ट भागात खरेदीसाठी मोठी झुंबड
उडालेली दिसून येत आहे, त्या भागात नागरिक विनामास्क फिरत
आहेत, त्यामुळे करोनाचा फैलाव अधिक होण्याची भीती आहे.
वास्तविक पाहता लॉकडाउनच्या काळात गुढी पाडवा, रामनवमी,
हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,
महावीर जयंती, महाराणा प्रताप जयंती हे उत्सव
नागरिकांनी सर्व नियम पाळून घरातूनच साजरे केले. त्या उलट शहराच्या काही विशिष्ट
भागात प्रार्थनास्थळे सुरू असून तेथे जाणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. त्या
ठिकाणी मास्कचा वापर केला जात नाही, सुरक्षित वावराचे पालन
केले जात नाही, हे कितपत योग्य आहे असा प्रश्न नियम
पाळणाऱ्या नागरिकांना पडत आहे. १५ मे च्या नंतरही लॉकडाउन वाढवण्याचा विचार
प्रशासन करीत असेल तर लॉकडाऊनची नियमावली तयार करताना सर्वस्तरातील व्यापाऱ्यांना
विश्वासात घेऊन नियमावली तयार करण्यात यावी.'
आरोग्य विषयक सेवा-सुविधा देताना खासगी
दवाखान्यांमध्ये भरमसाठ पैसे आकारले जातात,
त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी
करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत,त्यामुळे हा नोंदणीचा
प्रकार त्रासदायक ठरत आहे. याकडे देखील प्रशासनाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा खैरे
यांनी निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना
खैरे यांच्याबरोबर माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेनेचे
उपसचिव तथा माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख
गणू पांडे, आनंद तांदुळवाडीकर, शहरप्रमुख
विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, विजय
वाघचौरे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ
कुलकर्णी, व्यापारी महासंघाचे प्रफुल्ल मालाणी उपस्थित होते.
0 टिप्पण्या