Ticker

6/Breaking/ticker-posts

'ते नैराश्यात आहेत, त्यांच्या बोलण्याला महत्त्व देत जाऊ नका'

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर: नगर जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि भाजपचे नेते माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील एकमेकांवर आरोप-प्रात्यारोप करत असतात. अलीकडे मात्र थोरात यांनी विखेंच्या टीकेला उत्तर देण्याचे टाळले असल्याचे दिसून येते. संधी मिळताच विखे टीका करीत असले तरी पहिल्यासारखे थेट उत्तर देणे थोरात टाळत आहेत. आज तर विखेंच्या बोलण्याला फार महत्त्व देत जाऊ नका. ते नैराश्यात असल्याने असे बोलतात,’ असा सल्लाच थोरातांनी पत्रकारांना दिला.

संगमनेर शहरात गुरुवारी पोलिसांवर हल्ला झाला. गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. पोलिसांना धक्काबुक्की करून त्यांची राहुटीही उखडून टाकली. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा निषेध करताना विखे यांनी संगमनेर तालुक्यात लोकप्रतिनिधीचा वचक राहिला नसल्याची टीका केली होती.

संगमनेरमधील घटनेसंबंधी थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘ही घटना दुर्दैवी आहे. असे घडायलाच नको होते, असे आपले मत आहे. पोलिस आणि प्रशासन शेवटी जनतेच्या आरोग्यासाठीच काम करीत आहेत. त्यांचे काम ते करीत असताना त्यांना अशी वागणूक देणे चुकीचे आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्या दृष्टीने पोलिसांनी काम करावे,’ असेही थोरात म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी थोरात यांना विखेंच्या टीकेबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले, ‘विखे पाटील काय बोलतात याला फार महत्त्व देत जाऊ नका. ते विरोधी पक्षाच्या भूमिकेतून नैराश्यातून बोलत असतात. त्यांच्या मतदारसंघात कधी चुकीचे काही घडत नाही, असे नाही. शेवटी मानवी स्वभाव आहे. विखे यांचे बोलणे नैराश्यातून येत असते. त्यामुळे त्यांना मीडियाने फार महत्त्व देऊ नये, असे माझे मत आहे.

विखे आणि थोरात यांचे मतदारसंघ शेजारी-शेजारी आहेत. एकमेकांवर टीका करण्यासाठी मतदारसंघात घडणाऱ्या घडामोडींचाही वापर केला जातो. कामे करतानाही एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न केला जातो. त्यातून आरोप-प्रात्यारोप ठरलेलेच असतात. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महसूलमंत्री थोरात यांच्याशी संबंधित अनेक गोष्टींवर विखे टीका करण्याची संधी साधतात. पूर्वी जशासतसे उत्तर देणारे थोरात आता विखे यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळंच विखेंच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारणाऱ्या पत्रकारांना आज थोरातांनी विखेंना महत्त्व न देण्याचा सल्ला दिला.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या