Ticker

6/Breaking/ticker-posts

पंढरपूरमध्ये भाजपने कशी केली राष्ट्रवादीवर मात ? 'हा' एक मास्टरस्ट्रोक ठरला कारणीभूत !

 








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान अवताडे यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा ३ हजार ७३३ मतांनी पराभव करत अवताडे यांनी या मतदारसंघात कमळ फुलवलं. भाजपसाठी आव्हानात्मक वाटणाऱ्या या मतदारसंघात समाधान अवताडेंनी विजय कसा मिळवला, याबाबत अनेकांच्या मनात कुतूहल आहे. मात्र, या विजयासाठी भाजपने खेळलेला एक 'मास्टरस्ट्रोक' कारणीभूत ठरल्याचं दिसत आहे.


कोणत्याही पोटनिवडणुकीत दिवंगत लोकप्रतिनिधीच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास जनभावना त्याच्या बाजूने उभा राहिल्याचं पाहायला मिळतं. सहानुभूतीच्या लाटेत अनेकदा असे उमेदवार विजय होतात. मात्र पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात असं होऊ शकलं नाही. यामागे अनेक कारणं असली तरीही भाजपने मतदारसंघातील दोन मोठ्या गटांना एकत्र आणण्याचं कसब साधल्यानेच पंढरपूरमध्ये कमळ फुलल्याची चर्चा आहे.

भाजपचा मास्टरस्ट्रोक : अवताडे आणि परिचारक गटाचं मनोमिलन!

मतदारसंघात दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कामाबाबत अनुकूल मतं व्यक्त केली जात असल्याने भाजपसाठी ही निवडणूक कठीण ठरणार, हे पहिल्या दिवसापासून निश्चित होतं. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मतदारसंघात तळ ठोकल्याने भाजपसमोरचं आव्हान आणखीनच खडतर झालं. मात्र भाजपने तालुक्यात ताकदवान समजल्या जाणाऱ्या अवताडे आणि परिचारक गटाचं मनोमिलन घडवून आणलं आणि एकमताने समाधान अवताडे यांना उमेदवारी घोषित केली.

परिचारक आणि अवताडे गटाची युती तर झाली, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात हे दोन्ही गट एकदिलाने काम करणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं. परंतु प्रशांत परिचारक यांनी समाधान अवताडे यांच्या विजयासाठी मतदारसंघ पिंजून काढला. सोबतीला रणजीतसिंह मोहिते पाटील, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हेदेखील होते. तसंच राज्य पातळीवरून भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या निवडणुकीत चांगलंच लक्ष घातलं होतं.

भाजपच्या या रणनीतीचा परिणाम असा झाला की राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचं कठीण समजलं जाणारं आव्हान त्यांनी पार करून दाखवलं. या निवडणुकीत समाधान अवताडे यांना फार मोठं मताधिक्य मिळालं नसलं तरीही विजय खेचून आणण्यात त्यांना यश आलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या