लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आवश्यक बनलेल्या कोविन या अप्लिकेशनबद्दल सध्या
बऱ्याच तक्रारी येत आहेत. राज्यासाठी स्वतंत्र अप्लिकेशन असावे इथपासून त्याद्वारे
येणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाचा फोटो हवा, इथपर्यंत
विविध सूचना येत आहेत. अशीच एक सूचना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे
यांनी केली आहे. त्यामुळे जर राज्याचे स्वतंत्र अप्लिकेशन आलेच तर त्यावर
पंतप्रधानांसोबतच मुख्यमंत्र्याचाही फोटो नसावा, असेच यातून
ध्वनित होत आहे.
लसीकरणासाठी कोविन अप्लिकेशनसोबतच
महाराष्ट्राचे स्वतंत्र अप्लिकेशन असावे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी
तांबे यांनी उचलून धरली आहे. मात्र, याद्वारे देण्यात येणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्रावर कोणाचेच छायात्रित नसावे,
अशी सूचना त्यांनी केली आहे. ज्याचे लसीकरण झाले, फक्त त्याचेच छायाचित्र या प्रमाणपत्रावर असावे, अशी
भन्नाट कल्पना तांबे यांनी सूचविली आहे.
सध्या कोविन अप्लिकेशनवरून नोंदणी करण्यास
अडचणी येत आहेत. त्यावर ताण वाढला असल्याचे सांगण्यात येते. हा ताण वाढण्यासाठी
त्यावरील छायाचित्राचेही कारण असावे, असे तांबे यांनी म्हटले आहे. सध्या लसीकरणानंतर संबंधितांना जे प्रमाणपत्र
दिले जाते, त्यावर पंतप्रधान नरेंद मोदी यांचे छायाचित्र
येते. यापूर्वीही अनेकांनी हे छायाचित्र देण्याला हरकत घेतलेली आहे, काही नेत्यांनी यावर टीकाही केली आहे.
तांबे यांनी यासंबंधी कोणाचेही नाव न घेता
राज्याचे स्वतंत्र अप्लिकेशन असावे अशी सूचना करताना त्यावर लस घेतलेल्या
व्यक्तीशिवाय कोणाचेही छायाचित्र असू नये. राज्याचे स्वतंत्र अप्लिकेशन सुरू केले, तर कोविनवरील ताण कमी होईल आणि
छायाचित्र कमी केले तर आणखी ताण कमी होईल, अशी अपेक्षा तांबे
यांनी व्यक्त केली आहे.
राज्याचे स्वतंत्र अप्लिकेशन आले तर त्यावर
मोदींप्रमाणे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र,
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सरकारी योजनांच्या जाहिरातींमध्ये
छायाचित्र प्रसिद्ध करण्यावरून रस्सीखेच आहे. पूर्वी केवळ मुख्यमंत्र्यांचे
छायाचित्र असण्याला विरोध झाला होता. तेव्हाही युवक काँग्रेसनेच हरकत घेतली होती.
यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे फोटो देण्याचा तोडगा काढण्यात आला होता. जर
राज्याचे स्वतंत्र अप्लिकेशन आलेच आणि त्यावर छायाचित्राची वेळ आलीच तर पुन्हा हा
मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो, हेच यावरून दिसून येते.
एक मे पासून १८ ते ४४ वयोगटातील तरुणाईचे
लसीकरण सुरू झाल्यापासून या अप्लिकेशनवरील ताण आणि यासंबंधीची चर्चाही वाढली आहे.
नोंदणी करण्यात येणाऱ्या अडचणी, नोंदणी केल्यानंतर लसीकरणासाठी वेळ न मिळणे, लस
संपणे, लस न घेताच प्रमाणपत्र मिळणे अशा अनेक तक्रारी सुरू
आहेत. त्यातच राज्याचे स्वतंत्र अप्लिकेशन असावे, ही सूचना
पुढे आली आहे. शेअर बाजारावर लक्ष ठेवून राहावे, तसे या
अप्लिकेशनवर सतत लक्ष ठेवून लस उपलब्ध होताच नोंदणी करावी लागत असल्याच्या
प्रतिक्रियाही तरुणाईमधून व्यक्त होत आहेत.
0 टिप्पण्या