लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: कोरोनाच्या
संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी
दिल्याने राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी
सक्षम स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी. रेमडीसिव्हिररच्या पुरेशा पुरवठ्यासह
ऑक्सिजनच्या अखंडित उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे. राज्यात उभारण्यात
येणाऱ्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करण्याबरोबरच ऑक्सिजन वापराचे
ऑडिट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. ‘म्युकरमायकोसिस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला
असून त्यासाठी आवश्यक ३० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची
शक्यता गृहीत धरून प्रशासनाने उपाययोजनांसाठी तातडीने पावले उचलावीत. या लाटेत
लहान मुलांना कोरोनाचा अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे
लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी स्वतंत्र व्यवस्था
उभारावी. यामध्ये लहान मुलांचे व्हेंटिलेटर तसेच त्यांच्यासाठी लागणारी औषधे,
इतर उपचारांसाठीची सामुग्री उपलब्ध करावी. तिसरी लाट येण्यापूर्वी
ही व्यवस्था यथाशिघ्र उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपलब्ध मेडिकल ऑक्सिजनचे राज्यात
कार्यक्षमपणे वितरण होण्यासाठी कोविड रुग्णांची जिल्हानिहाय संख्या लक्षात घेऊन
वितरण करण्यात यावे, असे
सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना
दिल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक दोन
विभागांसाठी सचिव दर्जाचे अधिकारी त्यावर लक्ष ठेऊन त्याचे नियंत्रण करत आहेत.
त्यांनी राज्यात उभारण्यात येत असलेल्या नवीन प्लॅन्टच्या उभारणीच्या कामात समन्वय
ठेवत काम वेगाने करुन घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
मेडिकल
ऑक्सिजनच्या मागणीचे व्यवस्थापन आणि लेखापरिक्षण करण्याच्या सूचनाही यावेळी
देण्यात आल्या. प्रत्येक जिल्ह्यातील प्लॅन्टच्या व रुग्णालयाच्यास्तरावर टेक्नीकल
ऑडिट व मेडिकल ऑडिट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावे. ऑक्सिजनचा काटेकोरपणे
वापर होण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन नर्सची नियुक्त करण्याची कार्यवाही
करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.
0 टिप्पण्या