लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव :- कोरोना संसर्गाची भीती तसेच चिंतेमुळे ठाकूर निमगाव (ता.शेवगाव) येथील आबाजी घोरपडे (वय ६५) व सौ.चंद्रकला घोरपडे (वय ६०) हे वृद्ध दांपत्य शेतातील वस्तीवर राहते. त्यांची कोरोना टेस्ट करून घेण्याची मानसिक तयारी होती. मात्र, त्यांच्याकडे गावात कॅम्प स्थळी येण्यासाठी वाहन नव्हते, ही बाब बीडीओ महेश डोके यांना समजताच त्यांनी रणरणत्या उन्हात आरोग्य पथकासह दीड किमी अंतरावरील वस्तीवर धाव घेऊन आजी-आजोबांची टेस्ट करून घेत ' भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे ' असा दिलासा दिला. बीडीओंच्या या सकारात्मक भूमिकेचे सरपंच सौ. सुनीता संभाजी कातकडे यांनी कौतुक केले.
समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सीमा बहिर - गमे, आरोग्य सेवक आबासाहेब आमटे यांनी आजी-आजोबांची रॅपिड अँन्टीजेन टेस्ट केली. उभय दाम्पत्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.तरीही त्यांनी होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसेवक प्रदीप लबडे, पोलीस पाटील राजेंद्र बळीद, तलाठी महेंद्र शिंदे, संगणक ऑपरेटर निलेश बनसोडे आदी यावेळी उपस्थित होते.
कोरोना संसर्गामुळे ठाकूर निमगावमध्ये दहा दिवसात १७ निष्पापांचे बळी गेले. सध्या येथे आरटीपीसीआर व रॅपिड अँन्टीजेन टेस्टचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंगळवारी (दिं ११रोजी) बीडीओ महेश डोके यांनी ठाकूर निमगावाला भेट देऊन आरोग्य दूतांचे कौतुक केले. सध्या येथील ५८ रुग्णांवर विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर, ६५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
0 टिप्पण्या