लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
न्यूयॉर्क: इस्रायल-पॅलेस्टाइनमध्ये
सुरू असलेल्या संघर्षावर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र
संघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इस्रायल-पॅलेस्टाइनच्या संघर्षावर चर्चा झाली.
त्यावेळी भारताने पॅलेस्टाइनला पाठिंबा दर्शवला. दोन्ही देशांनी तातडीने तणाव कमी
करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी भारताने केली आहे. भारताने दोन्ही देशांदरम्यान
सुरू असलेल्या हिंसाचाराचाही निषेध केला.
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा
परिषदेच्या बैठकीत इस्रायल-पॅलेस्टाइनच्या संघर्षावर भारताचे प्रतिनिधी टी.एस.तिरुमूर्ती
यांनी भूमिका स्पष्ट केली. आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याची आणि तणाव
वाढवणाऱ्या कारवाया रोखण्याचे आवाहन करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय, जेरूसलेम पूर्व आणि त्याच्या जवळपासच्या
परिसरातील यथास्थिती एकतर्फी बदलण्याचे प्रयत्न होता कामा नये असेही भारताने
म्हटले. पॅलेस्टाइनच्या मागण्यांना भारताचा पाठिंबा असून दुहेरी राष्ट्राच्या
सिद्धांतानुसार तोडगा काढला पाहिजे असेही त्यांनी म्हटले.
मागील आठवड्यात जेरुसलेममध्ये सुरू झालेला
हिंसाचारा नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांमध्ये
झालेल्या घडामोडींमुळे परिस्थिती आणखी बिघडली असल्याचे तिरुमूर्ती यांनी म्हटले.
इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये चर्चा सुरू करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार
करण्यासाठी सुरू असलेल्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे त्यांनी
सांगितले.
तिरुमूर्ती यांनी या बैठकीत इस्रायलमध्ये
झालेल्या रॉकेट हल्ल्यात एका भारतीय महिलेचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले.
अश्कलोनमध्ये ही भारतीय महिला परिचारिका म्हणून काम करत होती. या महिलेसह
मृत्यूमुखी पडलेल्या इतर नागरिकांच्या निधनावर त्यांनी शोक व्यक्त केला.
0 टिप्पण्या