लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
श्रीरामपुर : एकीकीडे करोना संसर्ग
होऊ नये यासाठी काळजी घेतली जात असताना श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर येथे
वापरलेल्या करोना टेस्ट किटसह अन्य साहित्य नदीकाठावर फेकून दिल्याचे आढळून आले.
खासगी रुग्णालय किंवा लॅब चालकाने या साहित्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता
ते येथे उघड्यावर फेकून दिल्याचा संशय आहे. आरोग्य विभाग त्याचा शोध घेत आहे.
बेलापूर येथून वाहणाऱ्या प्रवरा नदीच्या
काठावर हा कचरा पडल्याचे आढळून आले. त्यामध्ये रॅपिड अँटीजेन टेस्टसाठीचे किट,
सलाईन, हातमोजे, मास्क
असे वापरलेले साहित्य आहे. नियमानुसार अशा कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट
लावणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात नदी काठावर ते उघड्यावर फेकण्यात आले होते. याची
माहिती गावातील प्रा. अशोक बडदे यांना मिळाली. त्यांनी तेथे जाऊन खात्री केली आणि
आरोग्य विभागाशी संपर्क केला. नदीवर मासेमारीसाठी अनेक जण येत असतात. तेथून जवळच
स्मशानभूमी आहे. या परिसरात माणसांचा वावर असतो ही बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.
याची माहिती मिळाल्यानंतर प्राथमिक आरोग्य
केंद्राचे डॉ. देविदास चोखर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पहाणी
केली. ज्या अर्थी या कचऱ्यात रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी वापरण्यात आलेल्या कीट आहेत, त्यावरून हा कचरा कोणी तरी खासगी
लॅबचालकाने फेकला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. हा कचरा योग्य पद्धतीने नष्ट
करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. येथे कचरा फेकणाऱ्याविरोधात पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. याशिवाय अशा
पद्धतीने कोणीही उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकू नये, अन्यथा
कारवाई केली जाईल, असा इशाराही डॉ. चोखर यांनी दिला.
0 टिप्पण्या