लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
जामखेड: अवघ्या
चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या जामखेडमधील नव दाम्पत्याने पाठोपाठ आत्महत्या
केली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजले नाही. आज दुपारी पत्नीने गळफास लावून
घेत घरी आत्महत्या केली, याची माहिती मिळताच तिच्या पतीनेही
आपल्या कार्यालयात गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त
करण्यात येत आहे.
जामखेड शहरात बीड रोडवरशिल्पा अजय जाधव (वय २८) या नवविवाहितेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या
केली. ही घटना तिचा पती अजय कचरदास जाधव (वय ३२)
याला समजली तेव्हा तो आपल्या थंड पाण्याचे जार पुरविणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात
होता. पत्नीच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यानेही तशाच पद्धतीने गळफास लावून
घेत आत्महत्या केली. एकाच दिवशी तासाभराच्या अंतरातच दोघांनीही आपले जीवन संपविले,
यामागील कारण स्पष्ट झाले नाही. अजय याने आपल्या आत्महत्येला
कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
मात्र, कारण अद्याप स्पष्ट झालेले नव्हते.
अजय व शिल्पा या दोघांचा विवाह चार
महिन्यांपूर्वीच झाला होता. बीड रोडवरील आदित्य गार्डन शेजारी हे दाम्पत्य राहते.
शिल्पा हिने दुपारी घरात गळफास लावून घेतला. तेव्हा तिचा पती कार्यालयात होता.
तिच्या आत्महत्येनंतर शेजारी जमा झाले. पोलिसांनाही बोलाविण्यात आले. तिने
आत्महत्या केल्याची माहिती पतीला कळविण्यात आली. त्यावर त्याने घरी न येता
ऑफिसमध्येच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळाल्यावर पुन्हा
सर्वांचीच धावपळ उडाली. या दोघांनी एकापाठोपाठ एक आत्महत्या का केल्या याचा उलगडा
करण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी सरकारी
रुग्णालयात नेण्यात आले. अजयचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव याने पोलिस स्टेशनला
याबाबत खबर दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अजय
याचा मोठा मित्र परिवार होता. लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांनीही आत्महत्या
केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या