लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ.नगर: 'प्रत्येक गावात गट-तट असतात हे
मला ठावूक आहे. पण सध्या युद्धाचा काळ आहे. या काळात काम केलं तर पुढील पाच
वर्षांत तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं आपापले गट-तट सांभाळून का
होईना करोनाविरूद्धाच्या उपाययोजनांचे काम सुरू ठेवा,' असं
कळकळीचं आवाहन नगरचे जिल्हाधिकारी डॉ.
राजेंद्र भोसले यांनी गावाचे सरपंच आणि पदाधिकाऱ्यांना केलं. ' जूनच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट सक्रीय होईल. पुढील वर्षभर तरी
आपल्या तोंडावरील मास्क आणि हातावरील सॅनिटायझर कायम राहील,' असा अंदाज सांगत हे गृहीत धरूनच काम करण्याचे आवाहनही त्यांनी केलं.
जिल्हाधिकारी भोसले यांनी थेट
ग्रामपातळीवरील अधिकारी आणि गावच्या सरपंचांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक,
तलाठी, पोलीस पाटील यांच्याशी त्यांनी
दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी आदर्श गाव संकल्प व कार्य समितीचे
कार्याध्यक्ष पोपटराव
पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नगर शहरातील रुग्ण
संख्या कमी होत असल्याने आता ग्रामीण भागावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, 'करोनाच्या पहिल्या लाटेत तीव्रता कमी असतानाही
सगळ्यांनी नियम पाळले. बाहेरुन व्यक्ती आली ही गावात त्याला विलगीकरणात ठेवले
जायचे. मात्र, आता एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाही नागरिक
गांभीर्याने याकडे पाहत नाहीत, ही चिंताजनक बाब आहे.
प्रशासनाला सहकार्य म्हणजे गावाने गावकऱ्यांनाच सहकार्य करण्यासारखे आहे. त्यामुळे
स्थानिक पातळीवरच सर्वांनी मिळून आता या करोनाचा सामना करायला हवा. गटतट पाहण्याची
ही वेळ नाही आणि ते असलेच तर प्रत्येकाने आपापल्या गटांची काळजी घेऊन करोनाला
हद्दपार करण्यासाठी एकत्र यावे, असं जिल्हाधिकाऱ्यांनी
म्हटलं आहे.
' ग्रामपंचायत हे युनिट मानून काम
करा. लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीने तात्काळ तपासून घेतले पाहिजे. व्यवस्थित
काळजी घेतली तर रुग्ण बरा होऊ शकतो. प्रशासन म्हणून सर्वतोपरी उपाययोजना केल्या
जात आहेत. करोना उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात सर्वांनी एकत्रित काम
करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण सुरु असले तरी वाढत्या
रुग्णसंख्येमुळे त्यावर ताण येऊ नये यासाठी प्राथमिक पातळीवरच सर्वेक्षणाचा वेग
वाढवून बाधितांना शोधण्याची मोहीम गतिमान करावी. संक्रमण होणारी ठिकाणे लक्षात
घेऊन तेथे प्रतिबंधात्मक नियमांचा भंग होणार नाही, याची
दक्षता घ्यावी. दूध संकलन केंद्रे, किराणा दुकाने, भाजीपाला विक्री केंद्रे, विविध कार्यकारी सोसायटी,
बॅंका याठिकाणी गर्दी होणार नाही, हे पहावे,
असंही त्यांनी म्हटलं आहे. हिवरेबाजार येथे करोना संसर्ग आटोक्यात आणण्यात तेथील
ग्रामपंचायतीने यश मिळविले आहे. त्यामुळे तेथील अनुभव आणि कशापद्धतीने तेथे
करोनाचा मुकाबला केला गेला त्याची माहिती पोपटराव पवार यांनी यावेळी दिली.
0 टिप्पण्या