Ticker

6/Breaking/ticker-posts

गोपीनाथ मुंडे यांच्याइतका छळ कोणत्याही नेत्याचा झाला नाही!; 'या' नेत्याचा दावा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

जळगाव:  करोना संसर्गामुळे अवघे जग ढवळून निघाले आहे. अशा परिस्थितीत राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन करोना विरुद्धचा लढा यशस्वी करावा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी करोनाच्या लढ्याबाबत मांडलेल्या भूमिकेचे स्वागत केले. मी गडकरींच्या मताशी सहमत असल्याचेही त्यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांच्याइतका छळ महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचा झाला नाही, असे विधानही खडसे यांनी यावेळी केले.

एकनाथ खडसे सोमवारी दुपारी जळगावात आले होते. आपल्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यावर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. एकनाथ खडसे पुढे म्हणाले, करोनाच्या लढ्याबाबत भाजप
 नेते नितीन गडकरी यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. हीच भूमिका महिनाभरापूर्वी मीदेखील मांडली होती. करोनाचे संकट दूर करायचे असेल तर सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यायला हवे. आम्ही विरोधक आहोत की सत्ताधारी हे विसरून करोना कसा दूर करता येईल, यासाठी विधायक सूचना देणे, प्रत्यक्ष कृतीद्वारे काम करणे गरजेचे आहे. यंत्रणेवर दररोज टीका करणे, त्रुटी काढणे असे प्रकार केल्यामुळे यंत्रणा नाउमेद होते. त्यामुळे असे प्रकार टाळायला हवे, असेही खडसेंनी सांगितले.


भाजप नेत्यांची ओबीसी नेत्यांबाबत असलेल्या भूमिकेवर मत मांडताना खडसे म्हणाले, भाजपने नेहमी ओबीसी नेत्यांना न्याय देण्याचे काम केले आहे पण अलीकडे चित्र बदलले आहे. भाजपच्या काही नेत्यांकडून ओबीसी नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. गोपीनाथ मुंडे यांचा अशाच पद्धतीने छळ झाला. त्यांचा जेवढा छळ झाला तेवढा महाराष्ट्रातील अन्य कोणत्या नेत्याचा झाला नाही. माझ्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात मी विधानसभेत भूमिका मांडली. परंतु, काही एक उपयोग झाला नाही. माझ्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे, अण्णा डांगे, भाऊसाहेब फुंडकर या नेत्यांचाही छळ झाला. आता तर चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळ यांना धमकी देणे हे तर भलतंच झालं. यावरून माझ्यामागे ईडी लावण्याचे षडयंत्र यांचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोपही खडसेंनी केला.

वर्षानुवर्षे अनेक सरकारे आली आणि गेली पण यापूर्वी असे ईडी
, सीबीआय यंत्रणेकडून विरोधकांना त्रास देण्याचे प्रकार कुणी केले नाहीत. पूर्वी या यंत्रणा तर जनतेला माहिती पण नव्हत्या. ईडी, सीबीआय तसेच एनआयए यासारख्या यंत्रणांद्वारे त्रास देणे चुकीचे असल्याचे मत खडसेंनी मांडले. दरम्यान, जळगाव महापालिकेतील गैरव्यवहारांच्या अनेक तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यांची सरकारी यंत्रणेकडून चौकशी व्हायला हवी अशी मागणीही खडसे यांनी यावेळी केली.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या