Ticker

6/Breaking/ticker-posts

'कोव्हिशिल्ड' लस आणि रक्तातील गुठळ्या! ही लक्षणे आढळल्यास करू नका दुर्लक्ष

 


- डॉ. अविनाश भोंडवे यांचे आवाहन

   लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

मुंबई: डिसेंबर २०२० पासून जगातील अनेक देशांत करोना प्रतिबंधक लस द्यायला सुरुवात झाली. भारतात १६ जानेवारी २०२१पासून लसीकरण मोहीम गटागटानं सुरू झाली. ही मोहीम सुरू होण्यापूर्वी करोनाची जगातील वाढती व्याप्ती लक्षात घेऊन, सर्व देशांनी ज्या-ज्या लशींच्या चाचण्यांचा दुसरा टप्पा पूर्ण झाला होता, त्यांच्या त्या टप्प्याअखेर मिळालेल्या परिणामांचं विश्लेषण केलं आणि त्यांना 'आपत्कालीन मान्यता' मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच देऊन टाकली.

लशींच्या मानवी चाचण्यांच्या तिसरा टप्प्यात साधारणपणे लशीमुळे आजाराविरोधी मिळणारी सुरक्षितता, लशीचा परिणाम किती काळ टिकतो याचा अंदाज आणि लशीमुळे होणारे तत्कालीन, दूरगामी दुष्परिणाम लक्षात येतात. मात्र, मार्च महिन्यापासून 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी'नं विकसित केलेली आणि 'अ‍ॅस्ट्रा झेनिका'नं उत्पादित केलेली लस घेतल्यावर जगातील अनेक देशांत, विशेषतः युरोपियन देशांत रक्तात गुठळ्या निर्माण होऊन अनेक व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या करिता 'युरोपियन मेडिसिन्स एजन्सी' आणि ब्रिटनमधील 'मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी' यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये, दर १० लाख व्यक्तींच्या लसीकरणामध्ये चार जणांना रक्तात गुठळ्या झाल्यानं मृत्यू पावल्याचं लक्षात आलं. मार्च-एप्रिल महिन्यापासून जर्मनी, स्वीडन, हॉलंड, स्पेन, डेन्मार्क, फ्रान्स या देशांत या लशीच्या वापरास काही काळासाठी बंदी पुकारण्यात आली.


ऑक्सफर्डची ही लस भारतात 'कोव्हिशिल्ड' या नावानं 'सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' ही पुण्यातील कंपनी बनवते. युरोपातील भीतीचे भारतातही पडसाद उमटले; पण आश्चर्य म्हणजे भारतात या लशीमुळे अशा गुठळ्या होण्याच्या घटना खूप कमी घडल्या. मात्र, 'कोव्हिशिल्ड' लस घेतल्यावर जगातील घटनांप्रमाणे भारतात काही घडतेय का, याची चाचपणी करण्यासाठी भारताच्या 'अ‍ॅडव्हर्स इफेक्ट्स फॉलोइंग इम्युनायझेशन' या संस्थेनं ३ एप्रिल २०२१पर्यंत झालेल्या, संपूर्ण भारतभरातील ७५३ पैकी ६८४ जिल्ह्यातील साडेसात कोटींपेक्षा जास्त व्यक्तींच्या लसीकरणपश्चात आलेल्या दुष्परिणामाचे सर्वेक्षण केले. त्यात त्यांना एकूण ७०० जणांना कोणते ना कोणते गंभीर साइड-इफेक्ट्स आल्याचे लक्षात आले. एकूणात हे प्रमाण १० लाख व्यक्तींमागे ९८३ एवढं होतं. त्यातील केवळ २६ जणांना रक्तात गुठळ्या होण्याचा दुष्परिणाम झाल्याचं सिद्ध झालं.

त्यामुळे या भारतीय संस्थेनं १७ मे २०२१रोजी जाहीर केलं, की भारतात लसीकरणानंतर रक्तात गुठळ्या होऊन व्यक्ती गंभीर होत आहेत; मात्र त्याचं प्रमाण कमालीचं अत्यल्प आहे. हे प्रमाण दर दहा लाख व्यक्तींमागे ०.६१ एवढेच आहे आणि युरोपियन देशांच्या १० लाखामध्ये ४ व्यक्ती, या तुलनेत कमालीचं अत्यल्प आहे. लस घेतल्यावर वीस लाखांत एकाला रक्तात गुठळ्या होऊ शकतात; पण बाकीच्या १९,९९,९९९ लोकांमध्ये करोना होण्याचा धोका टळतो, हे ध्यानात घेतल्यास करोना प्रतिबंधक लस घेण्यात काहीच घाबरण्यासारखं नाही हे लक्षात येतं.



तरीही एखाद्या व्यक्तीला 'कोव्हिशिल्ड' लस घेतल्यावर २० दिवसांमध्ये, खालील लक्षणं आढळली, तर त्याला रक्तात गुठळ्या होण्याचा त्रास होऊ शकतो. दम लागणं, छातीत दुखणं दंड किंवा पोटरी हातांनी दाबल्यास दुखणं किंवा त्यांच्यावर खूप सूज येणं, लशीचं इंजेक्शन घेतलेली दंडावरील जागा सोडून अन्यत्र लाल रंगाचे आणि टाचणीच्या वरील भागाच्या आकाराचे ठिपके किंवा रक्त साकळल्यासारखे चट्टे मोठ्या प्रमाणात आढळणं, उलट्या होऊन किंवा त्या न होताही पोटात खूप दुखणं, लस घेण्यापूर्वी पूर्वी कधीही अपस्माराचे झटके येण्याचा इतिहास नसतानाही, उलटीसह किंवा उलटीविना अपस्माराचे झटके येणं, लस घेण्यापूर्वी अर्धशिशी किंवा सततच्या डोकेदुखीचा त्रास असण्याचा इतिहास नसतानाही कमालीचं डोकं दुखणं, हात, पाय, चेहरा किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवामधील हालचाल होणं बंद होणं अथवा त्या भागात लकवा (पॅरॅलिसिस) बसणं कोणत्याही कारणाशिवाय सतत उलट्या होत राहणं, दृष्टी अंधुक होणं, एकाचं दोन दिसणं किंवा डोळ्यांमध्ये खूप वेदना होणं मानसिक स्थिती अचानक बिघडणं, खूप गोंधळल्यासारखं होणं किंवा कमालीचं नैराश्य येणं लस घेतलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना काळजी वाटेल असं अन्य कोणतंही लक्षण निर्माण होणं.

ही लक्षणं दिसल्यास त्वरित आपण लस घेतलेल्या लसीकरण केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यास तत्काळ कळवावं, असं केंद्रीय आरोग्यखात्यानं जाहीर केलं आहे. जागतिक पातळीवरील निर्णय ब्रिटनमधील नियामक संस्थांनी आणि 'ऑक्सफर्ड'नं ही लस घेतल्यावर होणाऱ्या त्रासापेक्षा ती घेतल्यावर करोना होण्याचा धोका टळणं हे जास्त महत्त्वाचं आहे, असं जाहीर केलं आहे. मात्र, तेथील आकडेवारीनुसार ५ मेपर्यंत लसीकरणापश्चात रक्ताच्या गुठळ्या झाल्याच्या २५२ केसेसची आणि ५१ मृत्यू झाल्याची बातमी आहे. ब्रिटन सरकारनं 'अ‍ॅस्ट्रा झेनिका'च्या लशीसोबत आता 'फायझर' आणि 'मॉडर्ना' कंपनीच्या लशीही उपलब्ध केल्या आहेत. त्याचबरोबर ब्रिटनच्या 'जॉइंट कमिटी ऑन व्हॅक्सिनेशन अँड इम्युनायझेशन'नं ४० वर्षांखालील व्यक्तींनी शक्य असल्यास 'अ‍ॅस्ट्रा झेनिका'च्या लशीऐवजी दुसरी लस घ्यावी असं सुचवलं आहे. जर्मनी, हॉलंड, स्वीडन, कॅनडा या देशांनी तरुणांना ही लस घेण्यास बंदी केली आहे. इटली आणि स्पेनमध्ये ६० वर्षांखालील व्यक्तींना ही लस देण्यावर निर्बंध घातले आहेत. स्पेनमध्ये ही लस ज्यांनी घेतली आहे, त्यांना दुसऱ्या डोससाठी वेगळी लस वापरल्यास काय होईल याचं संशोधन करण्याचा मनसुबा आहे. डेन्मार्कनं १४ एप्रिलपासून या लशीवर पूर्ण बंदी घातली आहे. फ्रान्सनं ५५ वर्षांखालील ज्यांनी या लशीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांनी दुसरा डोस 'फायझर' किंवा 'मॉडर्ना' लशींचा घ्यावा, असा आदेश काढला आहे. ऑस्ट्रेलियानं ही लस आयात करण्याचं थांबवून 'फायझर'च्या लशीच्या आयातीची ऑर्डर दुपटीनं वाढवली आहे.



भारतात मात्र 'कोव्हिशिल्ड' लस घेतलेल्या व्यक्तींनी दुसरा डोस त्याच लसीचा घ्यावा असं धोरण आहे. दरम्यान, या महिन्यात रशियाच्या 'स्पुटनिक-व्ही', 'स्पुटनिक लाइट' उपलब्ध होणार आहेत; शिवाय ऑगस्ट महिन्यापर्यंत 'सीरम इन्स्टिट्यूट'तर्फे 'जॉन्सन अँड जॉन्सन'ची 'नोव्हाव्हॅक्स', 'बायोलॉजिकल ई', 'झायडस कॅडिला', 'जिनोव्हा' याबरोबरच 'भारत बायोटेक'ची इंजेक्शनऐवजी नाकात थेंब टाकून घ्यायची लस अशा विविध लशींचे २१६ कोटी डोस भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहेत, असं 'निती आयोगा'नं जाहीर प्रतिपादन केलं आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या