Ticker

6/Breaking/ticker-posts

ती भीती अखेर खरी ठरली; रोहित पवारांचं ट्वीट चर्चेत

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर: तब्बल ६६ दिवसांनंतर देशात इंधनाची दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोल १५ पैसे तर डिझेल १८ पैसे प्रति लिटर महागले आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ही दरवाढ करण्यात आली आहे. निकालनंतर अशी दरवाढ होऊ शकते, अशा अंदाज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केला होता. त्यामुळे जी भीती होती, ती अखेर खरी ठरली, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.


देशात पेट्रोल आणि डिझेलचे नव दर दररोज जाहीर केले जातात. मधल्या काळात सातत्याने दरवाढ होत असल्याने आंदोलने झाली होती. मात्र, नंतर पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. तेव्हापासून म्हणजे २७ फेब्रुवारीपासून इंधनाचे दर स्थिर होते. एवढेच नव्हे तर मार्चमध्ये काही वेळा कपातही झाली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इंधनाची दरवाढ करणे अपेक्षित होते, तरीही ती टाळण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकांमुळे दरवाढ केली जात नसल्याची चर्चा सुरू होती. २ मे रोजी निकाल जाहीर झाले. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी इंधनाची दरवाढ करण्यात आली. तब्बल ६६ दिवसांनी आणि तुलनेत अल्पदरवाढ असली तरी निवडणुकीच्या संदर्भाने त्यावर चर्चा सुरू झाली आहे.


आमदार पवार यांनीही दोन दिवसांपूर्वी यावर भाष्य केले होते.
' चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलं आहे', असे पवार यांनी म्हटले होते. आज दरवाढीची घोषणा होताच पवार यांनी ट्विट करून म्हटले आहे की, जी भीती होती, ती अखेर खरी ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या