Ticker

6/Breaking/ticker-posts

करोना लसीने केले मालामाल, जगातील ९ व्यक्ती झाल्या अब्जाधीश; पुनावाला, पटेलांचीही संपत्ती वाढली

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 नवी दिल्लीः करोना संसर्गाने नागरिक त्रस्त आहेत. कुठे लॉकडाउन तर कुठे कडक निर्बंध. अनेक देशांमध्ये अजूनही लॉकडाउन सारखी स्थिती आहे. करोनाने अनेकांचे बळी घेतले आहेत आणि अजूनही व्हायरसचा प्रादुर्भाव होतच आहे. यामुळे अनेकांचे रोजगार गेले, नोकऱ्या गेल्या. पण करोनाच्या या स्थितीत करोनावरील लस बनवणाऱ्या कंपन्या मात्र मालामाल झाल्या. करोनावरील लस बनवणारे जगातील ९ जण मात्र अब्जाधीश झाले.

 जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. करोनाविरोधी लढाईत लस हाच एकमेव उपाय असल्याचं बोललं जातंय. यामुळे जागातील सर्वच देश जास्तीत जास्त नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या करोनावरील लसींच्या उत्पादनाने जगभरातील ९ व्यक्ती मात्र अब्जाधीश झाल्या आहेत. याचे संपूर्ण श्रेय हे पिपल्स वॅक्सिन अलायन्सला जाते. या संस्थेच्या मक्तेदारीने लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या अमाप नफा कमवत आहेत. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

अब्जाधीशांच्या यादीत समावेश झालेल्या ९ व्यक्ती या करोनावरील लसींचे उत्पादन करणाऱ्या औषध कंपन्यांचे मालक आहेत. हे मालक लसींच्या उत्पादनातून मोठ्या प्रमाणावर नफा कमवून हे अब्जाधीश झाले आहेत, असा दावा ऑक्झेम हेल्थ पॉलिसीच्या मॅनेजर अॅना मॅरिओट यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी लस उद्योग क्षेत्रातील औषध कंपन्यांची एकाधिकारशाही किंवा मक्तेदारी संपवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. पिपल्स वॅक्सिन अलायन्सने जारी केलेल्या निवेदनात करोनावरील लसीने अब्जाधीश झालेल्यांची माहिती दिली गेली आहे. करोनावरील लसीमुळे अब्जाधीशांच्या यादी समावेश झालेल्यांची एकूण संपत्ती ही १९.३ अब्ज डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये हा अकडा १४११.२२ अब्ज रुपये इतका होतो. ही रक्कम एवढी आहे की जगातील गरीब किंवा कमी उत्पन्न असलेल्या देशातील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी पुरेशी आहे. ही आकडेवारी फोर्ब्सच्या रिच लिस्ट डाटावर आधारीत आहे, असा दावा पिपल्स वॅक्सिन अलायन्सने केला आहे.


९ नव्या अब्जाधीशांमध्ये टॉपवर कोण?

औषध कंपन्या मक्तेदारीतून करोनावरील लसींवर मोठ्या प्रमाणात नफेखोरी करत असून हे ९ नवीन अब्जाधीश म्हणजे या लसींच्या नफेखोरीचा मानवी चेहरा आहेत. जगातील या ९ नव्या अब्जाधीशांमध्ये सर्वात टॉपवर आहेत मॉडर्नाचे  सीईओ स्टीफन बेन्सल  संपत्ती ४.३ अब्ज डॉलर्स ), दुसऱ्या क्रमांकावर बायोएनटेकचे सीईओ उगुर साहिन (संपत्ती ४ अब्ज डॉलर्स ), तिसरा क्रमांक तिमोथी स्प्रिंजर हे मॉडर्नाचे संस्थापक गुंतवणूकदार ( संपत्ती २.२ अब्ज डॉलर्स ), चौथ्या क्रमांकावर नौबर अफयान मॉडर्नाचे चेअरमन ( संपत्ती १.९ अब्ज डॉलर ), पाचव्या क्रमांकावर जुआन लोपेज बेलमोन्टे, ROVI कंपनीचे चेअरमन या कंपनीने मॉडर्नासोबत उत्पादन आणि पॅकेजिंगसाठी सौदा केला आहे ( संपती १.८ अब्ज डॉलर्स ), सहाव्या क्रमांकावर आहेत मॉडर्नातील संस्थापक गुंतवणूकदार आणि शास्त्रज्ञ रॉबर्ट लँगर. इतर तीन अब्जाधीशांमध्ये १.३ अब्ज डॉलरची चीनमधील लस बनवणारी कंपनी कॅनसिनो बायोलॉजिक्सचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी आणि सह संस्थापकांचा समावेश आहे.

या ९ अब्जाधीशांशिवाय ८ विद्यमान अब्जाधीशांमध्ये लस बनवणाऱ्या औषध कंपन्यांचे मालक आहेत. यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक  सायरस पुनावाला यांचाही समावेश आहे. सायरस पुनावाला यांची संपत्ती १२.७ अब्ज डॉलर्सनी वाढली आहे. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती ८.२ अब्ज डॉलर्स इतकी होती. याशिवाय कॅडिला हेल्थकेअरचे पंकज पटेल यांची संपत्ती वाढून या वर्षी ५ अब्ज डॉलर्सपर्यंत गेली आहे. गेल्या वर्षी त्यांची संपत्ती २.९ अब्ज डॉलर्स इतकी होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या