Ticker

6/Breaking/ticker-posts

'मुख्यमंत्री ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेचे 'फॅमिली डॉक्टर' बनून काम करताहेत'


 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबईः 'महाराष्ट्राच्या जनतेला अशा संकटसमयी मुख्यमंत्र्यांचा आधार वाटतो, हे दिलासादायक आहे. मुख्यमंत्री ठाकरे या संकटकाळात जणू कोविडॉलॉजिस्टच झाले. त्यांनी या संकटाचा खोलवर अभ्यास केला व आता महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेचे फॅमिली डॉक्टर बनून ते झोकून काम करत आहेत, असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून उतरणीला लागलेल्या करोना संसर्गानं मार्च- एप्रिल महिन्यात पुन्हा उचल खालली होती. राज्यात करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कठोर निर्बंध लागू करण्यात आले. लॉकडाऊनमुळं व प्रशासनाच्या उपाययोजनांमुळं राज्यातील करोनाचा आलेख पुन्हा कमी होऊ लागला आहे. मे महिन्यापासून करोना संसर्गाची आकडेवारी काहीशी दिलासादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्रेय देण्यात आलं आहे. तसंच, महाराष्ट्राचा 'फॅमिली डॉक्टर' असा उल्लेखही करण्यात आला आहे.

अग्रलेखात काय म्हटलंय?

 ' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'कोविड- 19', करोना संकट व उपाययोजना' यासंदर्भात केलेले सखोल अध्ययन महाराष्ट्राच्या कामी येत आहे. प्रत्येक मुख्यमंत्र्याची एक खासियत असते. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी करोनाशी लढा व त्याबाबत जनतेला मिळणाऱ्या आरोग्य सुविधा यातच 'नैपुण्य' प्राप्त केले असून आज संपूर्ण देशाला त्याचीच गरज निर्माण झाली आहे. देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन राजकीय आंदोलनासाठी रस्त्यावर उतरत होते तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे करोनाशी कसे लढावे याबाबत तज्ज्ञांशी सतत संवाद साधत होते. जगभरातील प्रसिद्धी माध्यमांत भारतातील प्रेतांचा खच, स्मशाने आणि कब्रस्तानांतील चेंगराचेंगरी याबाबत वार्ता आणि मन हेलावून टाकणारी छायाचित्रे रोजच प्रसिद्ध होत आहेत. त्यात महाराष्ट्र दिसत नाही याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच नाही द्यायचे तर कोणाला द्यायचे?' असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

' महाराष्ट्र सरकार कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज होत आहे. फॅमिली डॉक्टर्सवर जबाबदारी टाकण्याचा हेतू तोच आहे. तिसऱ्या लाटेचा सर्वात जास्त धोका लहान मुलांना आहे. लहान मुलांना तिसऱ्या लाटेच्या विळख्यात आणि तडाख्यात सापडू देऊ नये, हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने मुलांसाठी स्वतंत्र जम्बो कोविड सेंटर्स, आयसीयू बेड, निओनेटल व्हेंटिलेटर्स व्यवस्था आतापासून करण्यात आली आहे. याच बाबतीत मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सच्या तज्ञ डॉक्टरांबरोबरच हजारभर फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले,' असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.


' ऑक्सिजन, लसीकरण यावर मुख्यमंत्री जातीने लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्र्यांनी उगीचच हिंडणे,  फिरणे बंद केले. फालतू राजकारणाचे लॉकडाऊन करून संपूर्ण लक्ष कोरोना निवारण कामावरच केंद्रित केले. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनाही महाराष्ट्राची पाठ थोपटण्याचा मोह आवरता आला नाही. महाराष्ट्राने ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंसिद्ध होण्यात यश मिळविले आहे. काही काळापूर्वी राज्यातील स्थिती चिंताजनक होती. आता ती नियंत्रणात व आशादायक झाली आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंची पाठ थोपाटण्यात आली आहे,' अशी स्तुती शिवसेनेनं केली आहे.

'मुख्यमंत्री ठाकरे यांच्या डोक्यात फक्त कोरोना नियंत्रणाचे व लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्याचेच विचार घोळत असतात. शेवटी कोणत्याही संकटाशी लढताना आधी त्या संकटाचा संपूर्ण अभ्यास करणे महत्त्वाचे आणि प्रभावी ठरते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाचा सर्व बाजूंनी आणि बारकाईने जेवढा अभ्यास केला आहे तेवढा अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केला असावा, असे त्या त्या राज्यांतील कोरोनाच्या गंभीर स्थितीवरून वाटत नाही,' अशी टीकाही शिवसेनेनं केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या