*कोविड रुग्णांसाठी प्राथमिक शिक्षकांचे स्वयंप्रेरणेने पाच लाखाचे निधी संकलन
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव :-कोरोना संकटाच्या दुस-या लाटेत शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी सर्वांत आधी स्वयंप्रेरणेने पाच लाख रुपयांच्या मदतनिधीचे संकलन केले. त्याचे नगर जिल्ह्यात तसेच राज्यात अनुकरण झाले. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांची सामाजिक बांधिलकी राज्याला दिशादर्शक व आदर्शवत ठरली आहे,असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा ना. राजश्री घुले पाटील यांनी केले.
कोरोना संकट काळात शेवगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येऊन जमा केलेला सुमारे पाच लाख एक हजार एक रूपयांच्या निधीचा धनादेश नोडल अधिकारी शैलजा राऊळ व संघटना समन्वय समितीच्या सदस्यांनी काल बुधवारी ( दि. ५ रोजी) जिल्हा परिषद अध्यक्षा ना.घुले यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार अर्चना पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके, लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शेवगाव पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी तथा नोडल अधिकारी शैलजा राऊळ यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शेवगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने कोविड रूग्णांच्या मदतीसाठी निधी संकलन केले. शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले व गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड यांनी या उपक्रमासाठी शिक्षकांना प्रोत्साहन देत विशेष प्रयत्न केले.
या वेळी शिक्षक नेते तथा जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेचे माजी संचालक रघुनाथ लबडे , माजी संचालक विनोद फलके यांच्यासह प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.
0 टिप्पण्या