Ticker

6/Breaking/ticker-posts

माथाडी कामगारांचे राज्यपालांना साकडे

 






लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

 

नवी मुंबईः माथाडी कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करा, त्यांना रेल्वेने, परिवहन सेवेच्या बस व एसटीने प्रवास करण्यास परवानगी द्या, या घटकाला विशेष विमा संरक्षण कवच लागू करा, या मागण्यांकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासंदर्भात शिफारस करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी वाहतूक आणि जनरल कामगार युनियनचे नेते व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी   यांची राजभवनात भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

लॉकडाउनच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यापासून माथाडी कामगार व अन्य घटक जीव मुठीत घेऊन नागरिकांच्या अन्न-धान्य, मसाले, कांदा-बटाटा, भाजीपाला व फळे, गॅस सिलिंडर या जीवनावश्यक वस्तूंच्या मालाची तसेच खते, खाद्यमालाची चढ-उताराची कामे करीत आहेत. मात्र त्यांना अत्यावश्यक दर्जा अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना रेल्वे, बसमध्ये प्रवास करता येत नसल्याने त्यांना कामावर येण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही परवानगी त्यांना मिळावी या प्रमुख मागणीसोबत अन्य प्रलंबित मागण्यांसाठी ही भेट घेण्यात आली.

कामगारांनी आत्तापर्यंत त्यांच्या प्रश्नांची अनेक निवेदने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना सादर केली, लाक्षणिक संप केला, रेल्वे स्थानकासमोर महाराष्ट्र व कामगार दिन आणि माथाडी कामगार न्याय हक्क सप्ताह साजरा केला, परंतु याची दखल घेतली न गेल्याने माथाडी कामगारांनी थेट राज्यपालांना साकडे घातले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी भेटून माथाडी कामगार व अन्य घटकांच्या प्रश्नांचे निवेदन सादर केल्याचे माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले. राज्यपालांकडून आपल्याला न्याय मिळेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

या शिष्टमंडळात माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या समवेत अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, अधिकारी पोपटराव देशमुख यांचा समावेश होता.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या