लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर:- संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध
संघाच्या निवडणुकीत अखेर सत्तांतर झाले. विरोधी आघाडीने २१ पैकी तब्बल १७ जागा
जिंकत सत्ताधारी आघाडीला धोबीपछाड केले. या निकालाने महाविकास आघाडी अधिक भक्कम झाली असून भाजपआणि माजी आमदार महादेवराव
महाडिक यांना मोठा धक्का बसला आहे.
गोकुळ दूध संघावर गेली चाळीस वर्षे माजी
आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता होती. ती उलथवून
टाकण्यासाठी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास
मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह दोन खासदार आणि अनेक आमदार एकत्र आले होते. गेले महिनाभर
प्रचाराचा धुरळा उडाला होता. आमचं ठरले आता फक्त गोकुळ उरले असे म्हणत विरोधकांनी
प्रचाराचे रान उठवले होते. रविवारी अतिशय चुरशीने ९९ टक्क्यापेक्षा जास्त मतदान
झाले होते.
सकाळी कोल्हापुरातील बहुउद्देशीय सभागृहात
मतमोजणीला सुरुवात झाली. राखीव गटात पाचपैकी चार जागा जिंकत विरोधी आघाडीने
विजयाची सुरुवात केली. सत्ताधारी आघाडीच्या केवळ शौमिका महाडिक विजयी झाल्या.
त्यानंतर सर्वसाधारण गटाची मतमोजणी सुरू झाली,
नऊ फेरीमध्ये झालेल्या या मतमोजणीत प्रत्येक फेरीत विरोधी आघाडीने
बाजी मारली.
पहिल्या दोन-तीन फेरीतच सत्तांतर होणार
असे चित्र स्पष्ट झाल्याने निकालातील चुरस संपली. दहा वाजता अंतिम निकाल जाहीर
झाला त्यामध्ये सत्ताधारी आघाडीने १७ जागा जिंकल्या चे स्पष्ट झाले विरोधी आघाडीला
केवळ चार जागा मिळाल्या.
गोकुळ च्या निकालाने जिल्ह्यातील
राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असलेल्या या संघाची
वार्षिक उलाढाल तब्बल दोन हजार कोटींची आहे. यामुळे संघावर सत्ता मिळवण्यासाठी
जोरदार चुरस सुरू होती. त्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने
विरोधी शाहू शेतकरी आघाडी स्थापन झाली. या आघाडीने चाळीस वर्षाची महाडिक यांची
गोकुळ वरील सत्ता हिसकावून घेतली आहे. या निकालाने जिल्ह्यातील महाविकास आघाडी
अधिक भक्कम झाली आहे.
मंत्री पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे या सर्वांनी
आघाडी केल्यामुळे आणि हीच आघाडी यापुढेही कायम राहणार असल्याची शक्यता असल्याने
आगामी काळात भाजप आणि महाडिक यांची डोकेदुखी वाढणार आहे. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद यासह स्थानिक स्वराज्य संस्था
व सहकारी संस्था निवडणुकीत महाडिक गटासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.
या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने
सत्ताधारी भाजप आघाडीला तर जनसुराज्य शक्ती पक्षाने विरोधी महाविकास आघाडीला
पाठिंबा दिला होता. महापालिका, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा
आणि विधान परिषद या सर्व निवडणुकांत महाडिक गटाचा पराभव करत पाटील गटाने जिल्ह्यात
आपले वर्चस्व सिद्ध केले होते. गोकुळ दूध संघ ताब्यातून हिसकावून घेत गृहराज्यमंत्री
पाटील यांनी जिल्ह्यावरील आपली पकड अधिक भक्कम केली आहे.
0 टिप्पण्या