Ticker

6/Breaking/ticker-posts

बाळने कोठडीतून कुणाला केला फोन?; आणखी एक गुन्हा दाखल

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

पारनेर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे सध्या पारनेर येथे न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, त्याच्याविरुद्ध आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्याच्या कोठडीत अन्य आरोपीकडे एक मोबाइल आढळून आला होता. त्या मोबाइलचा वापर बोठे यानेही केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यासंबंधी दाखल गुन्ह्यात बोठेलाही आरोपी करण्यात येत आहे, अशी माहिती नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली.


रेखा जरे यांच्या खून प्रकरणात बोठेला पूर्वीच अटक झालेली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत पारनेर येथील कारागृहात आहे. गेल्या महिन्यात उपअधीक्षक पाटील, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर उपकारागृहाची झडती घेतली होती. तेव्हा तेथील दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी सौरभ गणेश पोटघन व अविनाश निलेश कर्डिले यांच्याकडे दोन मोबाइल सापडले होते. आरोपींनी हे मोबाइल पाईपमध्ये लपवून ठेवले होते. त्याच कोठडीत बोठे यालाही ठेवलेले आहे.

  आरोपींना हे मोबाइल जेवण पुरविणारे सुभाष लोंढे आणि प्रविण देशमुख यांनी पुरवले असल्याचे तपासात आढळून आले होते. त्यानुसार पारनेर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना हे मोबाइल कोणी कोणी वापरले, कोणा कोणाला त्यावरून संपर्क केला याची माहिती घेण्यात आली. त्यानुसार बोठे यानेही यातील एका मोबाइलचा वापर केल्याचे आढळून आले. यामुळे कारागृहात मोबाईल वापरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात बोठे यालाही आरोपी केले जाणार आहे. बोठेने कोणाला फोन केले, त्यातून काय संभाषण झाले, याचा तपास पोलीस करत आहेत.

बोठे याच्याविरुद्ध यापूर्वीच तीन गुन्हे दाखल आहेत. रेखा जरे यांचा खून, एका महिलेचा विनयभंग तर एका महिलेकडे खंडणी मागितल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्या सर्व गुन्ह्यांत त्याला अटक करण्यात आलेली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्यापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. यापूर्वी बोठेने आपल्याला नगर जिल्ह्याबाहेरील तुरुंगात ठेवण्याची मागणी केली होती. मोबाइल प्रकरणानंतर नगरच्या कारागृहात हलविण्याची मागणी केली होती. मात्र, यावर अद्याप काहाही निर्णय झालेला नाही. जरे यांच्या खून प्रकरणात त्याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच तेही दाखल केले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या