लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : कोरोना रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य विषाणूचा धोका वाढला
आहे. म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरुशी या आजाराची लागण झालेल्या राज्यातील
रुग्णांची संख्या 1 हजार 500 च्या
आसपास असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 2 दिवसांपूर्वी दिली होती. मात्र आता ग्रामीण
भागातही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे राज्यात या
आजाराचा धोका वाढल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी शनिवारी महत्वाची बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्रात वाढत्या म्युकरमायकोसिस धोका पाहता मुख्यमंत्र्यांनी
शनिवारी टास्क फोर्स आणि स्पेशलिस्ट डॉक्टरांची शनिवारी दुपारी 12 वाजेनंतर बैठक बोलावली असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत
म्युकरमायकोसिसचा संसर्ग रोखणे, लक्षण आणि उपाय, तसंच म्युकरमायकोसिसवरील औषधांची उपलब्धता आणि किमतीबाबत चर्चा होण्याची
शक्यता आहे. म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या रुग्णाला एम्फेटेरेसिन बी हे
इंजेक्शन दिलं जातं. पण या इंजेक्शनची किंमत सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी
नाही. त्यामुळे इंजेक्शनच्या उत्पादनवाढीसह त्याची किंमत कमी करण्याबाबत
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.
त्याबाबतही या बैठकीत चर्चा होईल, अशी शक्यता आहे.
‘रेमडेसिव्हीर’ पाठोपाठ वर्ध्यात ‘एम्फेटेरेसिन बी’ इंजेक्शनचीही निर्मिती
कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनची
निर्मिती करणाऱ्या जेनेटिक लाईफ सायन्सेसमध्ये आता एम्फेटेरेसिन बी हे इंजेक्शनही
तयार केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र
सरकारने वर्ध्यातील कंपनीला ही परवानगी दिली आहे. तशी माहिती कंपनीचे संचालक डॉ.
महेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे. येत्या 15 दिवसात हे
इंजेक्शन बनवण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
कोरोना रुग्णांना म्युकरमायकोसिस हा जिवघेणा आजार होत असल्याचं
पाहायला मिळतंय. राज्यात म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या 1 हजार 500 च्या आसपास पोहोचल्याची माहिती
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. त्यावेळी म्युकरमायकोसिसच्या
रुग्णांच्या दिल्या जाणाऱ्या एम्फेटेरेसिन बी इंजेक्शनबाबत टोपे यांनी केंद्र
सरकारकडे महत्वाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर वर्ध्यातील जेनेटिक लाईफ
सायन्सेसमध्ये या इंजेक्शनची निर्मिती होणार असल्याने म्युकरमायकोसिसच्या
रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अजून किती बळी घेणार आहात? राजू शेट्टींचा सवाल
म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करणार
असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. पण याबाबत अद्याप शासन आदेश निघालेला नाही.
त्यामुळे म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना या योजनेत समावेश होत नाही. त्यावरुन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर
जोरदार हल्ला चढवलाय.
“कोरोना नंतर होणाऱ्या Mucormycosis या आजारावरील उपचार जनआरोग्य योजने अंतर्गत होईल अशी घोषणा आरोग्य
मंत्र्यांनी करून 4 दिवस झाले.आद्यप शासन निर्णय झालेला
नाही.खासगी दवाखाने उपचारासाठी 10 लाख पॅकेजची मागणी करतात. Ambisome
या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा आहे,काळा बाजार
होतोय. सर्वसामान्य, गोरगरीब आपला जीव गमावतायत. एकट्या
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात 4 रुग्णांनी जीव गमावला,5 रुग्ण अत्यावस्थ आहेत.शासन
निर्णय होणार कधी? अजून किती लोकांचा बळी घेणार आहात?”,
असे प्रश्न राजू शेट्टी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला
विचारले आहेत.
0 टिप्पण्या