Ticker

6/Breaking/ticker-posts

मस्तच ! १५ मे ला हे गाव होणार करोनामुक्त; उरला केवळ एकच रुग्ण

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 


अ.नगर: आदर्शगाव हिवरे बाजार येथे सध्या उपचार घेत अलेला एकच करोनाबाधित रुग्ण उरला आहे. नियमानुसार १५ मे रोजी तो बरा होऊन घरी परतणार आहे. गावात नव्याने संसर्ग होऊ नये, यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात येणार असून त्यामुळे गाव करोनामुक्त होणार आहे, अशी माहिती आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव यांनी दिली.

हिवरे बाजारमध्ये एप्रिल व मे महिन्यात ५० जणांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी ३२ रुग्ण गावातच होते. त्यातील १८ रुग्ण हिवरे बाजारचे रहिवाशी परंतु कामानिमित्त बाहेरगावी असणारे होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. ५ रुग्ण गंभीर होऊनही बरे होऊन परतले. २५ रुग्ण यशवंत कृषी ग्राम व पाणलोट विकास संस्थेच्या हिवरे बाजार प्रशिक्षण केंद्रावर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. १८ रुग्ण स्वतच्या घरीच विलगीकरण कक्षात होते. ते सर्व आता बरे झाले आहेत.

सध्या केवळ एकच रुग्ण नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. १५ मे रोजी तोही पूर्ण बरा होईल. आता गावात नव्याने संसर्ग येऊ न देता गाव करोनामुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ग्रामपंचायत हिवरे बाजार, करोना समिती, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, यशवंत कृषी ग्राम व पाणलोट संस्था, ग्रामस्थ व स्वयसेवक यांच्या पुढाकारातून हे काम हाती घेण्यात आले आहे.

सध्या शेतीची कामे सुरू असल्यामुळे शेतात काम करण्यासाठी बाहेरचे कोकण, विदर्भ व परिसरातील जवळपास ३०० शेतमजूर कामावर आहेत. त्या सर्वांची वेळेवर तपासणी व शेतातच विलगीकरण करण्यात आले आहे. यासाठी गावातील स्वयसेवकांची ४ पथके तयार केली आहेत. प्रत्येक आठवडयाला तपासणी करून नोंदी ठेवल्या जात आहेत. लक्षणे आढळल्यास लगेच विलग करून उपचार सुरू केले जातात.



पद्मश्री पोपटराव पवार दररोज गावातील २५ कुटुंबाना भेट देऊन चर्चा करतात. प्रशिक्षण केंद्रातील विलगीकरण कक्षाला भेटी देतात. हॉस्पिटलमधील रुग्णांशी दूरध्वनीवर बोलतात. यामुळे रुग्णाचे मनोबल वाढते व मनातील भीती दूर होते. ग्रामपंचायतने ऑक्सिमिटर
, हॅण्ड ग्लोज, आयपॅड, सॅनीटायझर अशा सुविधा उपलब्ध केल्यामुळे कर्मचारी व स्वयंसेवक बाधित झाले नाहीत. ग्रामस्थ आणि गावातील विविध विभागांचे सरकारी कर्मचारी यांच्या प्रयत्नातून गाव करोनामुक्त करण्यासाठी मदत होत असल्याचे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या