लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
सातारा: ' पंतप्रधान
हे संपूर्ण देशाचे असतात. मात्र, नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातचेच पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत', अशी टीका
माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी
केली आहे.
तौत्के चक्रीवादळामुळे गुजरात मध्ये
मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी बुधवारी गुजरातचा हवाई पाहणी दौरा केला. या चक्रिवादळाचा फटका
महाराष्ट्रालाही बसला असताना पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीकडे
मात्र फिरकले नाहीत. त्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे.
नरेंद्र मोदी केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी
विचारला आहे.
'तौत्के चक्रीवादळामुळे देशाच्या
पश्चिम किनारपट्टीवरील पाच राज्ये प्रभावित झाली आहेत पण पंतप्रधान मोदींनी फक्त
गुजरात राज्याचा दौरा केला व त्या राज्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. हा भेदभाव
का? बाकीच्या राज्यातील पीडित जनतेच्या प्रति आपली काही
जबाबदारी नाही का?', असे ट्वीट पृथ्वीराज चव्हाण यांनी केले
आहे. पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत हे आता
स्पष्ट दिसत आहे, असा आरोप करताना पंतप्रधान असे का वागतात,
असा प्रश्नही चव्हाण यांनी केला. मोदी यांचे अन्य राज्ये व तेथील
लोकांकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे, असेही चव्हाण म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी तौत्के चक्रीवादळानंतर केवळ गुजरातचा
हवाई दौरा केल्याने महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी
काँग्रेसनेही यावरून निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी दीव-दमण आणि गुजरात
भागाचा हवाई दौरा करून पाहणी केली आहे. महाराष्ट्रातही तौत्के वादळाने नुकसान झाले
आहे, मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. तर कधीतरी
पंतप्रधान मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही वळेल. नरेंद्र मोदी दिलदार आहेत.
गुजरातला १ हजार कोटी दिले. महाराष्ट्राला दीड हजार कोटी देतील, असे विधान शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे.
0 टिप्पण्या