Ticker

6/Breaking/ticker-posts

मृतदेहाची अदलाबदल; संतप्त नातेवाईकांनी केली रुग्णालयात तोडफोड

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

यवतमाळ: येथील वादग्रस्त ठरलेल्या शहा हॉस्पीटल या खासगी कोविड दवाखान्यामध्ये मृतदेहाची अदलाबदल झाल्याने मृत रूग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड केली. आज रविवारी सकाळी ११ वाजता घडलेल्या या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यवतमाळ येथील ॲड. अरुण गजभिये आजारापणामुळे येथील शहा हॉस्पिटलमध्ये भरती होते. उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला होता.

नातेवाईकांनी सकाळी दवाखान्यातून ॲड. गजभिये यांचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह घेऊन सर्व नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामात पोहोचले. तेथे त्यांनी रॅपरमध्ये गुंडाळलेला मृतदेह उघडून बघितला असता तो ॲड. गजभिये यांचा नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. त्यामुळे संतप्त नातेवाईक मृतदेह घेऊन थेट शहा यांच्या दवाखान्यात पोहोचले. तेथे त्यांनी हॉस्पीटल व्यवस्थापनास जाब विचारला. मात्र, डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नातेवाईकांनी दवाखान्यात तोडफोड सुरू केली. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

ॲड. गजभिये यांच्या मृतदेहाऐवजी त्यांच्या नातेवाईकांना आर्णी येथील सेवानिवृत्त सहायक फौजदार दिगंबर शेळके यांचा मृतदेह देण्यात आला. शेळके यांचाही मृत्यू शनिवारी रात्रीच झाल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्यांच्या नातेवाईकांकडून देयकाची रक्कम जमा न केल्याने शेळके यांचा मृतदेह व्यवस्थापनाने दिला नाही, असा आरोप मनीषा दिगंबर शेळके यांनी यावेळी केला.

शेळके यांचे कुटुंबीय मृतदेहासाठी रात्रीपासून रुग्णालयात प्रतिक्षेत असताना त्यांचा मृतदेह गजभिये यांच्या नातेवाईकांना देऊन रूग्णालयाने दोन्ही कुटुंबीयांची फसवणूक करून मृतांची विटंबना केल्याचा आरोप यावेळी दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांनी केला.

या घटनेनंतर अवधूतवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत नातेवाईकांनी रूग्णालयात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. या घटनेनंतर रूग्णालय व्यवस्थापनाने सावरासावर करून ॲड. गजभिये यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना आपण सुपूर्द केलाच नव्हता, ते परस्परच मृतदेह घेऊन गेल्याने हा गोंधळ झाल्याचा दावा केला आहे. यावरही गजभिये व शेळके या दोन्ही कुटुंबियांनी आक्षेप घेतला.

रुग्णालयाने ॲड.गजभिये यांच्या नातेवाईकांना मृतदेह दिला नसेल तर तो त्यांनी कसा नेला, कोणतेही सोपस्कार न करता रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तो कसा नेवू दिला, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत हा गोंधळ सुरू होता. तोडफोड करणाऱ्यांसह डॉ. शहा यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे यांनी दिली.

प्राणवायू संपल्याने गोंधळ

शहा हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्ण मोठ्या प्रमाणात दाखल आहे. आज हा गोंधळ सुरू असातना दवाखान्यात एका सिलिंडरमधील प्राणवायू संपल्याने आणखी गोंधळ वाढला. अनेक रूग्णांच्या नातेवाईकांनी गोळा होऊन प्राणवायुची व्यवस्था करण्याची मागणी केली. पोलिसांनाही याबाबत सांगितले. अखेर पोलिसांनी धावपळ केली. त्यानंतर काही वेळाने सिलिंडर घेऊन वाहन दाखल झाले. तेव्हा कर्मचाऱ्यांना हाताशी घेत प्राणवायु संपलेले सिलिंडर बदलल्याने संभाव्य अनर्थ टळला. शहा हॉस्पीटलमध्ये तोडफोड होण्याची महिना भरातील ही दुसरी घटना आहे. या दवाखान्यात रूग्णांची प्रचंड आर्थिक लुट होऊनही प्रशासनाच्या वरदहस्तामुळे हॉस्पीटल व्यवस्थापनाची मुजोरी वाढल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या