लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर : महाराष्ट्रावरील करोनाच्या
दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेलं संकट अद्यापही दूर झालेलं नाही. मात्र असं
असतानाही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. मुंबईत
करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप भाजप नेते आणि
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र
फड्णवीस यांनी केला होता. या
आरोपाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
' कोविडच्या मृतांची आकडेवारी
लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे,'
असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. तसंच कोविडचा हा लढा संपलेला
नाही, त्यामुळं राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा
एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात, असं
आवाहनही रोहित पवार यांनी केलं आहे.
'एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं'
'कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं
राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील,
यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं,' असं
म्हणत रोहित पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला
आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नक्की काय म्हटलं होतं?
'मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी
आकडेवारी उजेडात येऊ न देणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी
करीत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून
कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता लढ्यात बाधा उत्पन्न होत आहे,'
असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना
पत्र लिहिलं आहे.
0 टिप्पण्या