लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पारनेर : पारनेरचे
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांची कोविड केअर सेंटरमधील सेवा सध्या राज्यभर गाजत आहे. सेंटरमध्ये
रुग्णांसोबतच मुक्काम करून सेवा देत असलेल्या लंके यांच्या उपक्रमांना सर्वत्र
प्रसिद्ध मिळत आहे. यातील एक बातमी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिली आणि ते काहीसे
रागावले. मास्क किंवा सुरक्षित अंतराचा कोणताही नियम न पाळता काम करणाऱ्या निलेश
लंके यांना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत सुनावलं. ‘ काम
चांगले आहे, ते सुरू ठेव पण आधी तुझी काळजी घे,’ असा सल्ला अजित पवार यांनी दिला.
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे
निलेश लंके यांनी एक हजार खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे
अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने सुरू केलेल्या या केंद्रासाठी देशविदेशातून मदत
येत आहे. तेथील सेवा आणि उपक्रमांसाठी ते राज्यभर प्रसिद्ध झाले आहे. स्वत: लंके
या केंद्रात पूर्णवेळ थांबून रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक
होत आहे. त्यासंबंधीची बातमी आज सकाळी अजित पवार यांच्या पाहण्यात आली. ती बातमी
पाहून त्यांनी लंके यांना फोन केला.
फोनवर निलेश लंके यांना दादानी सुनावले ?
अजित पवार यांनी लंके यांच्या कामाचे
कौतुक करून काळजी न घेतल्याबद्दल त्यांनी लंके यांना सुनावले. अजित पवार म्हणाले, ‘रूग्णांची सेवा करतोय यात आनंद आहे,
मात्र सामाजिक अंतर, मास्क, ग्लोज, सॅनिटायजर आदींच्या वापराकडे दुर्लक्ष होत
आहे. त्याकडे लक्ष देत जा. तुझ्या जनतेसाठी तुझे आरोग्य ठणठणीत असले पाहिजे.’
यावर लंके यांनी सारवासारव करण्याचा
प्रयत्न करून काळजी घेत असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर अजित पवार आणखी
भडकले. म्हणाले, ‘कशाचे काय?
सकाळपासून दहा वेळा तुझा व्हिडीओ पाहिलाय. हवी तेवढी काळजी तू घेत
नाहीस. तुझे तुझ्या जनतेवर प्रेम आहे हे मान्य, मात्र
त्यांची काळजी घेताना तुझीही काळजी घे. काही मदत असेल तर सांग,’ असेही पवार म्हणाले.
निलेश लंके यांच्या कामाची यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही दखल घेतली आहे. पाटील
यांनीही लंके यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. ‘थेट रुग्णांच्या संपर्कात जाऊ नका. कोणी विचारले तर
जयंत पाटलांनी असं सांगितलंय म्हणा,’ असे सांगत पाटील यांनी
लंके यांना काळजीचा सल्ला दिला होता.
0 टिप्पण्या