लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नागपूर: करोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या अंगावरील दागिने आणि इतर
साहित्य चोरण्याचा प्रकार उघडकीस येऊन काही दिवस लोटत नाही तोच करोना बाधित
व्यक्तीचा मृतदेह कचरा संकलन गाडीतून नेण्याचा संतापजनक प्रकार बुटीबोरीत घडला
आहे. असा प्रकार एकदा नव्हे तर दोनवेळा घडला असून चीड आणणाऱ्या या घटनेचे कुठलेही
सोयरसुतक प्रशासनाला नाही.
जयराम नेवारे (वय ४७, रा. प्रभाग क्रमांक ८, जुनी वस्ती, बुटीबोरी) यांचा १३ मे रोजी घरीच
करोनामुळे मृत्यू झाला. त्याप्रसंगी त्यांचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी
कचरागाडीचा वापर करण्यात आला. या घटनेवर गावातील सजग नागरिकांनी तीव्र संताप
व्यक्त केला. तसेच असा प्रकार पुन्हा घडू नये, अशी अपेक्षा
व्यक्त केली. त्यानंतर १८ मे रोजी शंकुतला खांदारे (वय ७०, रा. प्रभाग क्रमांक ८, जुनी
वस्ती, बुटीबोरी) यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेहदेखील
अशाच प्रकारे अत्यंसंस्कारासाठी नेण्यात आला. त्यावेळी काही ग्रामस्थांनी हा
संपूर्ण प्रकार मोबाइलमध्ये कैद केला. सामाजिक कार्यकर्ते तुषार दरेकार यांनी या प्रकाराला वाचा फोडत बुटीबोरी नगरपरिषदेचे
मुख्याधिकारी चिखलखुंदे यांच्याकडे तक्रार केली. त्यावर यापुढे अशी घटना घडणार
नाही. करोना बाधितांचे मृतदेह शववाहिकेतून नेले जातील, असे
आश्वासन त्यांनी दिले.
नगरपरिषदेकडे स्वत:ची शववाहिका नाही
बुटीबोरी नगरपरिषदेकडे स्वत:च्या हक्काची
शववाहिका नाही. परिसरातील सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्या शववाहिका आहेत. त्यासाठी मृताच्या
कुटुंबीयांना शुल्क द्यावे लागते. नागपूर सारख्या मोठ्या शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बुटीबोरी
नगरपरिषदेकडे स्वत:ची शववाहिका नसण्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच
करोना बाधितांचे मृतदेह कचरागाडीतून नेण्याचा प्रकार प्रशासनाची असंवेदनशीलता
दर्शवित असल्याची टीका होऊ लागली आहे.
0 टिप्पण्या