लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर : महिलांना
मंदीर प्रवेश आणि महिलांच्या हक्कांसंबंधीच्या विविध मागण्यासंबंधी आंदोलने
करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आता वेगळ्याच कारणासाठी
परमेश्वराला साकडं घातलं आहे. ‘महाराष्ट्रावर सध्या संकटामागून संकटं येत असून
यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना परमेश्वरानं शक्ती द्यावी,’
असं साकडं देसाई यांनी घातलं आहे.
शनिशिंगणापूर येथील शनी चौथऱ्यावर
महिलांना प्रवेश देणे, शिर्डी
येथील साईबाबा संस्थांनने भाविकांसाठी केलेल्या ड्रेस कोड विरोधातील आंदोलन,
महिलांच्या विरोधात वक्तव्य केले म्हणून कीर्तनकार निवृत्ती महाराज
इंदुरीकर यांच्या विरोधातील आंदोलन, महिला अत्याचाराचे आरोप
झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधातील भूमिका अशी अनेक आंदोलने
देसाई यांनी केली आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांसोबतच सध्या राज्यात सत्तेवर
असलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्याही रोषाला त्यांना अनेकदा सामोरे जावे लागले
आहे. अनेकदा अटकेच्या कारवाईला समोरे जावे लागले आहे. भाजप शिवसेनेचे सरकार असताना
आणि आता महाविकास आघाडीचे सरकार असतानाही त्यांची आंदोलने मोडून काढण्याचाच
सरकारकडून प्रयत्न झाला.
अशा परिस्थितीत देसाई यांनी
मुख्यमंत्र्यांची बाजू उचलून धरली आहे. ही संकटे हातळण्यात राज्य सरकार आणि
मुख्यमंत्री अपयशी ठरत असल्याचे आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहेत. या
पार्श्वभूमीवर देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतूक करून त्यांच्यासाठी
परमेश्वराला साकडं घातलं आहे. मात्र, यामध्ये उध्दव ठाकरे यांचे नाव घेण्याचं टाळत केवळ मुख्यमंत्री पद म्हणून
त्यांनी हे साकडं घातलं आहे.
0 टिप्पण्या