Ticker

6/Breaking/ticker-posts

JEE Main एप्रिल सत्र परीक्षा लांबणीवर; नवी तारीख लवकरच

 


लोकनेता न्यूज                                         

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 नवी दिल्ली: देशातील आयआयटींमधील आणि अन्य इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट मेन अर्थात जेईई मेनची एप्रिल सत्र परीक्षा (JEE Main April Session 2021) लांबणीवर टाकण्यात आली आहे. करोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.


ही परीक्षा २७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणार होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत ही परीक्षा घेण्यात येते. रमेश पोखरियाल यांनी ट्विट केले आहे की, 'करोना विषाणू संसर्गाची सद्यस्थिती पाहता मी एनटीएला सल्ला दिला होता की एप्रिलमध्ये होणारी जेईई मेन्स परीक्षा स्थगित केली जावी. आपल्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचे करिअर महत्त्वाचे आहे.' पोखरियाल यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला पाठवलेले पत्रही या ट्विटमार्फत शेअर केले आहे.

एनटीएद्वारे जारी केलेल्या पत्रात लिहिलंय की 'कोविड-१९ महामारीची वर्तमान स्थिती पाहता उमेदवार आणि परीक्षा अधिकाऱ्यांची सुरक्षा आणि कल्याण ध्यानात घेऊन JEE Main 2021 एप्रिल सत्र परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'

एनटीएने असंही सांगितलं आहे की नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांना परीक्षेआधी किमान १५ दिवसांचा अवधी मिळेल. दरम्यान, यापूर्वी सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे तर बारावीची परीक्षा लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्रातही दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या