Ticker

6/Breaking/ticker-posts

Covid 19: कोरोनाची दुसरी लाट थोपवायला आता डिसेंबर महिना उजाडेल; AIIMS प्रमुखांचे भाकीत

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट परतवून लावायला आता डिसेंबर महिना उजाडेल. 2021  च्या अखेरपर्यंत परिस्थिती स्थिर होईल. त्यानंतर 2022 च्या मध्यात संपूर्ण जग पुन्हा मोकळा श्वास घेईल, असे भाकीत भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वर्तविले आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धची ही लढाई आता भारताला दीर्घकाळ लढावी लागणार, हे आता स्पष्ट होत आहे.

 

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. गुलेरिया यांनी यासंदर्भात भाष्य केले. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविषयी लोकांमध्ये गांभीर्य नसल्याने कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करुन त्यांना सुरक्षित करणे हाच मार्ग उरला असल्याचे त्यांनी म्हटले.

देशात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात लसीकरण मोहीम सुरु झाली तेव्हा अनेकांना कोरोनाची साथ संपली असे वाटले. मात्र, कोरोनाच्या विषाणूने स्वत:मध्ये बदल घडवले आणि तो नव्या स्ट्रेनसह परत आला. त्यामुळे गेल्या 40 दिवसांपासून देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांची टक्केवारीही 85.56 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

देशात सध्याच्या घडीला प्रत्येक दिवशी 2,50,000 लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत. हा आकडा असाच वाढत गेल्यास आगामी काळात भारताची परिस्थिती अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही बिकट होऊ शकते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूदर कमी असला तरी रुग्णांच्या प्रचंड संख्येमुळे आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहेत.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 67 हजार 468 नवे कोरोना रुग्ण

गेल्या 24 तासांत राज्यात 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल 67 हजार 468 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज 54 हजार 985 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 लाख 27 हजार 827 वर पोहोचला आहे. त्यातील 32 लाख 68 हजार 449 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 61 हजार 911 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या