Ticker

6/Breaking/ticker-posts

गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश...; राष्ट्रवादीकडून CM ठाकरेंवर स्तुतीसुमने

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:महाविकास आघाडी सरकारअस्तित्वात आल्यानंतर संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशाने हे सरकार चालवू असा संकल्प आम्ही केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातून त्याची प्रचिती आली, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मांडले आहे

करोना विरोधात लढण्यासाठी निर्बंध घालताना शासनाने पहिला विचार गोरगरिबांचा केल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी नमूद केले आहे. राज्याला व जनतेला या संकटातून बाहेर काढण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्यावतीने सर्व प्रयत्न केले जात आहेत. प्रशासन अहोरात्र काम करत असून आज आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी जनतेला केले आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करा. आपण करोनाची ही साखळी निश्चितपणे तोडू असा विश्वासही पुढे जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे  यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा दाद दिली. उद्धव ठाकरे हे किती प्रामाणिक नेते आहेत व कसे जमिनीवर राहून परिस्थितीनुरूप निर्णय घेतात हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. प्रत्येकाच्या हिताचा विचार करत त्यांनी एका जबाबदारीने पावले टाकली आहेत. आता करोनाची साखळी तोडण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे, अशा आशयाचे ट्वीट करत सुप्रिया सुळे यांनी निर्णयाचे समर्थन केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना राज्यात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून १ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यासोबत राज्यात कोविड निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. हे करतानाच विविध घटकांचा विचार करत ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेजही जाहीर करण्यात आले आहे. थेट लॉकडाऊन न लावता मुख्यमंत्र्यांनी निर्बंधांबाबत समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक बाबतीत सवलती देण्यात आल्या आहेत. त्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या