लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई:-केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई
बोर्ड दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी ज्या पद्धतीचा अवलंब करणार आहे, त्या पद्धतीचा महाराष्ट्राचा
शालेय शिक्षण विभाग अभ्यास करणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही
माहिती दिली. सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षाच यंदाच्या वर्षासाठी रद्द
करण्याचा मोठा निर्णय बुधवारी जाहीर केला, तर बारावीच्या
परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. यानंतर गायकवाड यांनी सोशल मिडीयाच्या
माध्यमातून ही माहिती दिली.
महाराष्ट्रातील करोना संसर्गाची स्थिती
देशाच्या तुलनेत खूपच गंभीर आहे. या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वर्षा
गायकवाड यांनी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी,
बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय १२ एप्रिल रोजी जाहीर
केला. मात्र त्यानंतर दोनच दिवसात, बुधवारी सीबीएसई बोर्डाने
दहावीच्या परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. देशातील जवळपास सर्व राज्यात
सीबीएसई या केंद्रीय बोर्डाच्या शाळा आहेत. वाढत्या संक्रमणामुळे या ऑफलाइन
परीक्षा घेणे कठीण असल्याने बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करून पर्यायी
निकषांवर मूल्यांकनाची पद्धत तयार करण्याचे ठरवले आहे. ही पद्धत कशा प्रकारची असेल,
त्याने दहावीच्या विद्यार्थ्यांचे कमीत कमी शैक्षणिक नुकसान होईल का,
या सगळ्याचा अभ्यास तज्ज्ञांमार्फत करणार असल्याचे गायकवाड यांनी
सांगितले. राज्यातील दहावीच्या परीक्षेबाबतही या प्रकारे निर्णय घेता येईल का याची
चाचपणी राज्य सरकारने करण्यास सुरुवात केली असल्याचे यावरून दिसून येते.
काय म्हणाल्या
शिक्षणमंत्री?
'करोनाच्या वाढत्या
प्रादुर्भावामुळे या काळात परीक्षा घेणं योग्य राहणार नाही, म्हणूनच
महाविकास आघाडीने तीन दिवसांपूर्वी राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा
पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी आम्ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय
बोर्डांनाही परीक्षा पुढे ढकलण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत आज केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावीची परीक्षा पुढे
ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. मला सांगायला हवं की मुलांचे आरोग्य आणि त्यांची
सुरक्षितता हीच राज्यातील महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे. सीबीएसई बोर्डामार्फत
दहावीच्या परीक्षा रद्द करताना मूल्यांकनासाठी इंटरनल असेसमेंट किंवा ऑब्जेक्टिव
क्रायटेरियाच्या ज्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे, त्या
पद्धतीचा आम्ही अभ्यास करू आणि त्यासंदर्भात तज्ज्ञांशी सल्लामसलत करू,' अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या