लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नाशिक :-करोनामुळे एकीकडे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, त्र्यंबकेश्वर येथील ९४ वर्षांचे आजोबा आणि
त्यांच्या ८४ वर्षीय पत्नीने करोनावर मात केली असून, सध्या
ते अगदी ठणठणीत आहेत. या दाम्पत्याचा व्हिडीओही व्हायरल झाला असून, त्याद्वारे ते आपण करोनावर कशी मात केली हे सांगून सकारात्मक राहण्याचा
संदेश देत आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराजाच्या मंदिराचे मुख्य पुजारी सुनील शुक्ल
यांचे वडील त्र्यंबक सदाशिव शुक्ल (वय ९४) आणि आई कृष्णाबाई त्र्यंबक शुक्ल (वय
८४) या दोघांना काही दिवसांपूर्वी सर्दी, खोकला, कफ, अशक्तपणा अशी लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर करोना टेस्ट केली असता, दोघेही पॉझिटिव्ह
असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबालाच करोनाचा संसर्ग झाला होता.
अगदी त्यांचा पाच वर्षांचा पणतूही यातून सुटला नव्हता. आजोबांचा एचआरसीटी स्कोअर
दहा, तर आजींचा आठवर गेला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात
दाखल करण्यात आले. त्यानंतर दोघांनीही घाबरून न जाता करोनाचा धीराने सामना केला.
डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन केले. विशेष म्हणजे या काळात
दोघांनीही सकारात्मक विचार ठेवले. त्यामुळे दोघेही या आजारातून पूर्णपणे बरे झाले.
यानंतर इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी व्हिडीओद्वारे आपण करोनावर कशी
मात केली हे सांगत घाबरून न जाता सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आरोग्यदायी
जीवनशैलीचा फायदा
आजोबा आणि आजी दोघांचीही जीवनशैली
पूर्वीपासूनच धार्मिक आणि आरोग्यदायी होती. दररोज पहाटे उठणे, पूजा-अर्चा करण्यासह त्र्यंबकराजाच्या
दर्शनाला जाणे. भरपूर फिरणे, योगासने-प्राणायाम करण्यासह
शाकाहाराचे सेवन अशी दैनंदिनी असल्यामुळे त्यांना रक्तदाब, मधुमेह
असे कुठलेही आजार आतापर्यंत झाले नाहीत. दोघेही अगदी ठणठणीत होते. या जीवनशैलीचाही
त्यांना करोनाला हरविण्यासाठी फायदा झाला.
महिन्यापूर्वी आम्हा पती-पत्नीला करोना
झाला होता. आम्ही त्यावर मात करून सुखरूप घरी आलो. घाबरून न जाता सकारात्मक विचार
ठेवायला हवेत. स्वच्छतेसह करोनाचे नियम पाळा. मास्कचा वापर करा. डॉक्टरांनी दिलेले
औषधे नियमित घ्या. त्यातून हा आजार नक्कीच बरा होतो. - कृष्णाबाई शुक्ल, करोनामुक्त आजी
0 टिप्पण्या