Ticker

6/Breaking/ticker-posts

आर्चीच्या गावाची कमाल !; कोविड लढ्यात केली ही 'सैराट' कामगिरी

 








लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

करमाळा : केळीची बागारस्त्याच्या बाजूला असलेली नारळाची झाडंलांबपर्यंत दिसणारी ऊसाची शेतीत्यात लक्ष वेधून घेणारा आर्चीचा बंगला असे  'सैराट' चित्रपटातील दृश्य आपणा सर्वांना आठवत असेलच... याच आर्चीच्या गावाने अर्थात कंदर  या गावाने आता करोना काळात आपल्या गावातील गावकऱ्यांसाठी स्वतःचं कोविड सेंटर उभारलं आहे. या निमित्ताने कंदर ग्रामपंचायतीने राज्यातल्या इतर ग्रामपंचायतींना एक नवा आदर्श घालून दिला आहे.

 राज्यात आणि देशात सध्या करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. करोना बाधित रुग्णांची संख्या रोज झपाट्याने वाढत आहे. सरकार पातळीवर या साथीला रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर जीवाचं रान करत आहेत. प्रशासनही करोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्व उपाय करत आहे. त्याला प्रतिसाद म्हणून अनेक गावे प्रशासनाच्या मदतीला येताना दिसत आहेत. तसाच प्रतिसाद करमाळा तालुक्यातील कंदर या गावाने एक पाऊल पुढे टाकत दिला आहे. आपल्या गावातील एकही रुग्ण गावाबाहेर उपचारासाठी जाऊ नये म्हणून गावातच  कोविड केंद् सुरु करण्याचा निर्णय या गावाने घेतला असून त्याचे कामही सुरू केले आहे. यासाठी प्रत्येक गावकरी यथाशक्ती मदत करत आहेत. गावच्या सरपंच मनीषा भास्करराव भांगे यांनी स्वत:ची शाळा या कोविड केंद्रासाठी खुली करून दिली आहे. बचत गट बेड्स देत आहेत. कुणी जेवणाची व्यवस्था करायची जबाबदारी स्वीकारलीय तर कुणी स्वयंसेवक म्हणून काम करायला तयार आहे. रोख रक्कम देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी असून आतापपर्यंत २ लाखांची लोकवर्गणी जमा झाली आहे. यातून सामान्य बेड व १० ऑक्सिजन बेड व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे गावातील रुग्णांना गावातच उपचार मिळू शकतील. सध्या येथे ऑक्सिजनची यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे ती सोलापूर जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत डॉक्टर्स आणि नर्स स्टाफ मिळण्याची.

'सैराट'  झालं जी...
उजनी  धरणाच्या काठावर सोलापूर-अहमदनगर महामार्गावर कंदर हे गाव आहे. या भागात एखादी व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आली तर अकलूज, सोलापूर, करमाळा किंवा बार्शीला उपचारासाठी जावे लागते. मात्र सध्याच्या परिस्थितीत तिथे सर्व सुविधा उपलब्ध होतीलच याची शाश्वती नाही. म्हणूनच गावाने हा पुढाकार घेतला आणि गावातच सर्व सुविधा असलेले कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. याला प्रशासनानेही प्रतिसाद दिला असून करमाळ्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर गायकवाड यांनी त्यासाठी गावात येवून पाहणीही केली आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. त्यात अख्खं गाव झोकून देवून काम करत आहे.

 या गावात ऊस आणि केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या केळीचे आगार म्हणूनही या गावाने ओळख निर्माण केली आहे. मराठी सिनेसृष्टीला नवीन ओळख निर्माण करून देणाऱ्या सैराटचित्रपटाचे चित्रीकरण या गावात झाले होते. अशी वैशिष्ट्यपूर्ण ओळख असलेल्या या गावाने स्थानिक हेवेदावे, गावगुंडगिरीचं राजकारण विसरून करोनाशी दोन हात करण्यासाठी पुन्हा नव्याने 'सैराट' प्रयत्न चालवले आहेत. सध्या गावासाठी काहीतरी करण्याचे दिवस आहेत. यातूनच गावाने पुढाकार घेतला आहे. सरपंच मनीषा भांगे, उपसरपंच मौलासाहेब मुलाणी, ग्रामविकास अधिकारी सलीम तांबोळी यांच्यासह गावातील तरुण, ग्रामस्थ व बचत गट यांच्या सहकार्यने हे कोविड सेंटर सुरू होणार आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या