लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई :-मुंबईसह राज्यात संचारबंदी, जमावबंदी आणि शनिवार-रविवार
लॉकडाउनची घोषणा झाल्यावर आता मजुरांनी गावाकडची वाट धरली आहे. कामगार-मजुरांचे
तांडेचे तांडे गावाकडे प्रस्थान करत आहे. यामुळे मेट्रोची कामे, पुलांची देखभाल-दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या कामांना पुन्हा खीळ
बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकमान्य
टिळक टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल, बोरिवली, ठाणे, पनवेल, कल्याण या स्थानकांत कामगारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुढील
महिनाभर केशकर्तनालय, उपहारगृहे, चित्रपटगृहे,
मॉल बंद राहणार आहेत. मुंबईसारख्या महागड्या शहरात कमाई नसल्यास
रोजच्या खाण्या-पिण्याच्या समस्या निर्माण होतात. हा जगण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी
हा कामगार वर्ग गावाकडे
निघाला आहे.
राज्यात संपूर्ण लॉकडाऊन नसले तरी करोनासंसर्ग रोखण्यासाठी
काही गोष्टी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेले वर्षभर आर्थिक
चणचण भासत आहे. अशातच आता पुन्हा टाळेबंदी करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत.
त्यांचे पालन करत कामगारांना बिनपगारी सुट्टी दिली आहे. केवळ १ ते २ कामगारच
साफसफाईसाठी ठेवण्याचे नियोजन केल्याचे दादरमधील सलून व्यावसायिकांनी सांगितले.
रेल्वे स्थानक आणि परिसरात गर्दी होऊन
कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाने मनुष्यबळ
तैनात केले आहेत. स्थानकात गर्दी होऊ नये, याची खबरदारी ही सुरक्षा यंत्रणांकडून घेण्यात येत आहे.
मेट्रोची कामे रखड्णार ?
' मुंबई लोकल'ला
पर्याय म्हणून आकार घेत असलेल्या 'मुंबई मेट्रो'ला लॉकडाउनचा फटका बसण्याची शक्यता आहे. मेट्रो-२ ए आणि मेट्रो-७ यासाठी
मे महिन्यात चाचणी घेण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले होते. मात्र आता मजूरच
स्वगृही परतल्याने चाचणी रखडणार की काय, असा प्रश्न निर्माण
होत आहे. यापूर्वी जानेवारी २०२१, मार्च २०२१ मध्ये चाचणी
करण्याची तयारी प्रशासनाने केली होती. '
कामगार गेल्याने मेट्रो कामे थांबणार नाही, मेट्रोचाचणी पूर्वनियोजित वेळेत अर्थात मे महिन्यातच पार पडेल', असा दावा 'एमएमआरडीए'कडून
करण्यात येत आहे.
मेट्रो वेळापत्रकात बदल
अंधेरी-घाटकोपर-वर्सोवा मार्गावर
धावणाऱ्या 'मेट्रो वन'नेदेखील लॉकडाउनमुळे वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आज,
मंगळवारपासून राज्यात कडक निर्बंध लागू होतील. यामुळे प्रवासी
संख्येत घट होण्याची शक्यता आहे. यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात येत असून,
येत्या काही दिवसांत ते जाहीर करण्यात येईल, असे
मुंबई 'मेट्रो वन'कडून सांगण्यात आले.
0 टिप्पण्या