Ticker

6/Breaking/ticker-posts

करोना रुग्ण ४ दिवसांत चिंताजनक बनतोय; रोहित पवार यांचा केंद्रावर गंभीर आरोप

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर: ‘ करोना व्हायरस आता बदलला आहे. वास्तविक पहाता दर पंधरा दिवसाला राज्यांतून नमुने घेऊन या बदलांवर लक्ष ठेवणे अपेक्षित होते. मात्र, हे काम आपल्या देशात झालेले नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सध्याच्या परिस्थितीत पक्षीय राजकारण नव्हे तर माणुसकीच्या भावनेने सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे आपल्याला वाटत असल्याचेही ते म्हणाले. आमदार रोहित पवार आज नगर शहरात आले होते. येथील कोविड रुग्णालयांना त्यांनी भेटी दिल्या. जिल्हा सरकारी रुग्णालयात जाऊन तेथील ऑक्सीजन आणि औषधांच्या उलब्धतेची माहिती घेतली. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशीही त्यांनी संवाद साधला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, ‘पंतप्रधान 
नरेंद्र मोदी कोणत्या पक्षाचे आहेत, यापेक्षा ते या देशाचे पतंप्रधान आहेत या दृष्टीने पाहिले पाहिजे. तशीच त्यांची जबाबदारीही आहे. सध्या केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अनेक राज्यांत करोनाचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्रात किमान क्षमता तरी आहे. मात्र, बिहारसारख्या राज्यांची परिस्थिती अवघड आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. तशी ती जाऊ नये, यासाठी सर्वांनी मिळून वेळीच उपाययोजना हाती घेतल्या पाहिजेत.रेमडेसीव्हर इंजेक्शनचा तुटवडा आहे. मात्र, अशाही परिस्थिती आपण आतापर्यंत ११ लाख इंजेक्शन्स निर्यात केली आहेत. दरमहा, पाच लाख इंजेक्शन्स निर्यात करीत असताना इकडे हजार इंजेक्शनसाठी आपली धावपळ होत आहे, हा मोठा विरोधाभास आहे. ऑक्सीजनची क्षमता वाढविणे हे एक दिवसाचे काम नाही. मात्र, लवकरच या दोन्हींचा पुरवठा सुरळीत होईल,’ असेही पवार म्हणाले.


करोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास 
केंद्र सरकार कमी पडले हे सांगताना पवार म्हणाले, ‘सध्या जो करोनाचा व्हायरस आहे, तो बदलतो आहे. पूर्वी आठ दहा दिवसांत फारसा परिमाण होत नव्हता. आता चौथ्या दिवशीच रुग्णाची परिस्थिती गंभीर होत आहे. करोनाच्या या बदलावर केंद्र सरकारने लक्ष ठेवायला हवे होते. नियमितपणे नमूने घेऊन त्यांची तपासणी करून नोंदी ठेवल्या असत्या तर हे बदल लक्षात येऊन त्या दिशेने उपाययोजना करता आल्या असत्या. हे काम आपल्या देशात झालेले नाही. पक्षीय राजकारण सोडून सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीचा मुकाबला करण्यची गरज आहे,’ असेही ते म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या