लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पुणेः राज्यात ऑक्सिजनचा
तुटवडा निर्माण झाल्यामुळे वसंतदादा शूगर इस्न्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष आणि
माजी केंद्रीय मंत्री शरद
पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजननिर्मिती करण्याच्या सूचना साखर आयुक्तालयाला केल्या आहेत. त्यानुसार साखर आयुक्त
शेखर गायकवाड यांनी आढावा घेतला असता, राज्यात सद्यस्थितीत
किमान १५ साखर कारखाने हे ऑक्सिजननिर्मिती करून शकणार आहेत. त्यामुळे साखर
कारखान्यांद्वारेही ऑक्सिजनची गरज भागविली जाणार आहे.
राज्यात
ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होत असल्याने ऑक्सिजन उपलब्धतेसाठी प्रशासनाकडून विविध
मार्गांनी प्रयत्न करण्यात येत आहेत. साखर कारखान्यांनी ऑक्सिजननिर्मितीचे प्रकल्प
उभारण्याबाबतची सूचना पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी साखर आयुक्तालयाला दिले आहे.
त्यानुसार साखर आयुक्त गायकवाड यांनी याबाबत साखर कारखान्यांशी संपर्क साधून आढावा
घेतला आहे.
याबाबत गायकवाड म्हणाले‘ राज्यातील साखर कारखान्यांपैकी सुमारे
१५ कारखाने हे ऑक्सिजनची निर्मिती करू शकतात. त्यांच्याशी संपर्क साधून माहिती
घेतली आहे. साखर कारखान्यांकडे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी किमान
चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र, किमान १५
कारखान्यांमध्ये तातडीने प्रकल्प सुरू होऊ शकतात’
‘साखर कारखान्यांना ऑक्सिजननिर्मिती
प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक निधीची गरज आहे. बँकांकडून कर्ज देताना ऑक्सिजन
विक्रीची खात्री आहे का, याची विचारणा केली जाते. यातून
मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे’ असे गायकवाड यांनी स्पष्ट
केले.
दरम्यान, राज्यात सहकारी आणि खासगी असे १९० कारखाने आहेत. त्यापैकी
यंदाच्या हंगामात १८८ कारखान्यांनी गाळप घेतले आहे. या कारखान्यांपैकी सर्व कारखान्यांची
ऑक्सिजननिर्मितीची क्षमता नाही. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर किमान १५ साखर
कारखान्यांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले
आहेत.
0 टिप्पण्या