लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर:- नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीहून रेमडेसिवीर आणून वाटल्याच्या प्रकरणाला उच्च न्यायालयात वेगळेच वळण लागले आहे. नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज झालेल्या सुनावणीच्यावेळी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, विखे पाटील हॉस्पिटलच्या मेडीकल स्टोअरकडून मिळालेल्या पैशातून जिल्हा शल्यचिकित्सकांनी १७०० रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुण्यातील एका कंपनीतून आणली. त्यातील काही साठा विखे पाटील मेडीकल स्टोअरला देण्यात आला. यावर न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले असून त्यावर सविस्तर अहवाल ३ मे रोजी सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात
सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी
ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे व बी. यू. देबडवार
यांच्यासमोर यावर सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने ऍड. सतीश तळेकर,
ऍड. प्रज्ञा तळेकर व ऍड. अजिंक्य काळे काम पहात आहेत, तर सरकारच्या वतीने ऍड. डी. आर. काळे काम पाहात आहेत.
गुरूवारी
झालेल्या सुनावणीच्यावेळी याचिकाकर्त्यांनी शपथपत्रद्वारे बातम्यांची कात्रणे दाखल
केली. त्यामधून निदर्शनास आणून दिले की, नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. विखे यांच्याबरोबर पत्रकार
परिषद घेऊन १७०० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा जिल्हा रुग्णालयाला दिला आहे. त्यावर
सरकारी वकिलांनी जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल सादर करून ती इंजेक्शन पुण्यातून
आणल्याचे सांगितले. या याचिकेत सामील होण्यासाठी काही रुग्णांच्या वतीने
दाखल करण्यात आलेले हस्तक्षेप अर्ज न्यायालयाने फेटाळले. पुढील सुनावणी ३ मे रोजी
होणार आहे.
0 टिप्पण्या