लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ.नगरः पाथर्डी तालुक्यातील एका कोळसाभट्टीच्या मालकाने
कोकणातील एका दहा वर्षांच्या मुलीला सहा वर्षे डांबून ठेवले होते. रायगड
जिल्ह्यातील सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्यामुळे या चिमुरडीची सुटका झाली. मात्र, तक्रार नसल्याने त्या
मालकाविरूद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. मुलीची आणि तिच्यासोबत आणखी एका व्यक्तीची
सुटका झाल्यातच या आदिवासी कुटुंबाने समाधान मानले आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या
नगर जिल्ह्यातील संघटना मात्र यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगण्यात आले.
रोहा तालुक्यातील (जि. रायगड) चिंचवली येथील आदिवासी मजूर
कुटुंबातील सहा जणांचे कुटुंब सहा वर्षांपूर्वी पाथर्डी तालुक्यातील आंबेवाडी
येथील एका कोळसाभट्टी मालकाकडे मजुरी कामासाठी आले होते. त्यांनी कायमस्वरुपी येथे
रहावे, असा मालकाचा अग्रह होता. मात्र,
मजुरांच्या कुटुंबाला ते शक्य नव्हते. काही दिवसांनी मजुरांनी परत
जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते मालकाकडे हिशोब मागू लागले. त्यामुळे
चिडलेल्या मालकाने सर्वांना हाकलून दिले. मात्र, त्यांची एक
लहान मुलगी (आताचे वय दहा वर्षे) आणि आणखी एका व्यक्तीला तेथेच ठेवले. मुलीची
सुटका करावी म्हणून तिच्या पालकांनी अनेकदा विनंती केली, मात्र
मालकाने ऐकले नाही. मधल्या काळात मुलीचे आई- वडिल आपल्या लहानग्या मुलीला
आणण्यासाठी आंबेवाडीला आले होते. तरीही मालकाने या मुलीला त्यांच्या ताब्यात दिले
नाही. आदिवासी कुटुंबाला काय करावे हे सूचलेच नाही, त्यामुळे
ते परत कोकणात गेले.
अलीकडेच कोकणात सामाजिक काम करीत असलेल्या सर्वहारा जन आंदोलन
या संघटनेची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार या कुटुंबाने संघटनेचे जिल्हाध्यक्ष
सोपान सतार यांची ७ एप्रिल २०२१ रोजी भेट घेतली. त्यांना सर्व हकिगत सांगितली.
घटनेचे गांभीर्य आणि आदिवासींची असहाय्यता लक्षात आल्यावर सुतार यांनी पाथर्डी
पोलिस ठाण्यात संपर्क साधला. तेथील अधिकाऱ्यांना आदिवासी कुटुंबासोबत घडलेला प्रकार
सांगून मुलीची सुटका करण्याची विनंती केली. पोलिसांनी तातडीने दखल घेत आंबेवाडी
येथे पोलिस पथक पाठविले. मात्र त्या कोळसा भट्टीचा मालक गेल्या सहा महिन्यांपासून
तिथे राहत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परंतु, एक आदिवासी लहान मुलगी त्यांच्याकडे असल्याची माहिती
पोलिसांना तेथील लोकांना दिली. पोलिसांनी त्या मालकाचा मोबाईल नंबर मिळवून
त्याच्याशी संपर्क केला. तेव्हा त्याने आपण कर्नाटकात असल्याचे सांगितले. शिवाय ती
लहान मुलगी आपल्याकडे असल्याचेही त्याने कबूल केले.
पोलिसांकडून फोन आल्यानंतर मालकाने लगेच तेथून कोकण गाठले.
आदिवासी कुटुंबाच्या घरी जाऊन त्या मुलीला त्यांच्या ताब्यात दिले. एवढ्या
वर्षांनंतर आपली मुलगी मिळाल्याने त्या कुटुंबाला मोठा आनंद झाला. त्यांनी तक्रार
न दिल्याने पोलिसांनी भट्टी मालकाविरूदध अद्याप कारवाई केलेली नाही. पोलिसांच्या
मते तो मालक कर्नाटकात होता आणि तिकडूनच त्याने मुलीला ताब्यात दिले असल्याने
पाथर्डीत गुन्हा दाखल केलेला नाही.
0 टिप्पण्या