लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
बीड:- रुग्णांची संख्या वाढत
असताना आणि सरकारी-खासगी रुग्णालये हाउसफुल्ल झाली असताना बीड जिल्ह्यातील एका
गावाने पुढाकार घेत कोव्हिड केअर सेंटर सुरू
केले आहे. गावातील शाळेमध्ये हे सेंटर सुरू करण्यात आले असून, या सेंटरमधील रुग्णांना आरोग्य विभागाकडून वैद्यकीय सुविधा पुरविण्यात
येणार आहेत. तर, रुग्णांच्या जेवण्याखाण्याच्या खर्चाचा भार
हे गाव उचलणार आहे. पाटोदा तालुक्यातील कुसळंब असे या गावाचे नाव आहे.
मांजरा नदीचा उगम असणाऱ्या या गावातून सामूहिक
पुढाकाराने सुरू झालेल्या हा उपक्रम राज्यभरात जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात
येत आहे. बीड जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार कुसळंब गावातीलच
आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरपंच शिवाजी पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पवार
यांची भेट घेत शाळेत कोव्हिड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर
राधाकिसन पवार यांनी गावात जाऊन बैठक घेतली गावकऱ्यांशी चर्चा करून कोव्हिड केअर
सेंटर सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली. त्यानुसार, खंडेश्वर
विद्यालय येथे शुक्रवारी कोविड केअर सुरू करण्यात आले.
कुसलंब हे आपलं गाव व आजूबाजूच्या वीस गावांचा
व्यवहार या गावावर अवलंबून आहेत. त्या गावांनाही या सेंटरचा फायदा होणार आहे. येथे
दाखल होणाऱ्या सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णावर सरकारी खर्चाने उपचार
होतील. या ठिकाणी रुग्णाची सर्व तपासणी, औषधोपचार सरकारने नेमलेल्या एजन्सीकडून तपासणी होईल. ‘आयसीएमआर’च्या निकषानुसार रुग्णावर उपचार करण्यात
येणार आहेत.२४ तास वैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत तसेच अँटिजेन व आरटीपीसीआर
नमुने घेण्याची सोय या ठिकाणी असणार आहे.
‘ मानवलोक’चीही मदत
नाष्टा-जेवणाचा भार गावाने उचलण्याचे
ठरवले आहे. या केंद्राचे सनियंत्रण आरोग्य विभाग करणार आहे. अंबाजोगाई येथील
स्वयंसेवी संस्था मानवलोकने रुग्णांना बेडपासून सर्व भौतिक सुविधा पुरवल्या आहेत.
योगशिक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडून रुग्णांसाठी
संध्याकाळी मनोरंजन कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे .
{आमचे गाव, स्मार्ट
गाव, आदर्श गाव आहे. वीस वर्षांपासून निवडणूक न घेता
बिनविरोध ग्रामपंचायत होत आहे आणि कोरोनाची साथ असताना स्थानिक स्वराज्य संस्था
म्हणून ग्रामपंचायतची लोकप्रति काहीतरी जबादारी आहे हे वाटल्याने आम्ही कोव्हिड
सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला..
- शिवाजी पवार, सरपंच, कुसळंब }
0 टिप्पण्या