लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक उद्या (बुधवार) दुपारी साडेबारा
वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली
होत असून या बैठकीत लॉकडाऊन आणि
राज्यातील पुढच्या टप्प्यातील लसीकरणाबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.
तसे स्पष्ट संकेत आज मिळाले आहेत.
राज्यात करोना संसर्गाची साखळी
तोडण्यासाठी १ मे सकाळी सात वाजेपर्यंत कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. या
निर्बंधांबाबत १३ एप्रिल रोजी एक आदेश काढण्यात आला होता. त्यानंतरही गर्दी कमी
होत नसल्याने सुधारित आदेश काढून २२ एप्रिलपासून निर्बंध अधिक कडक करण्यात आले.
त्यात पूर्वीच्या लॉकडाऊनसारख्याच गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.
सामान्यांना लोकल रेल्वे, मेट्रो आणि मोनो सेवेची दारे बंद
करण्यात आली आहे तर एका शहरातून दुसऱ्या शहरात व एका जिल्ह्यातून दुसऱ्या
जिल्ह्यात जाण्यावरही बंधने आणली गेली आहेत. अत्यावश्यक कारणासाठी दुसऱ्या
जिल्ह्यात वा दुसऱ्या राज्यात जायचे असल्यास ई-पास सक्तीही करण्यात आली आहे.
राज्यात निर्बंध कडक करण्यात आल्यानंतर
लगेचच रुग्णसंख्येत विशेष फरक पाहायला मिळाला नाही. मात्र काल सोमवारी
रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळाली. दररोज ६६ ते ६८ हजार नवीन रुग्ण आढळत होते
तिथे काल ४८ हजारांपर्यंत आकडा खाली आला. मुंबई व पुणे या प्रमुख शहरांतही
रुग्णसंख्येत मोठी घट झाली. त्याचवेळी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. काल एकाच
दिवशी ७१ हजारांवर रुग्ण करोनामुक्त झाले. हे एकप्रकारे चांगले संकेत असून या
अनुषंगाने उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे. लॉकडाऊनचे सकारात्मक
परिणाम दिसत असल्याने आणखी एक आठवड्यासाठी वा दोन आठवड्यांसाठी सध्याचे निर्बंध
कायम ठेवले जावू शकतात, असेही
संकेत मिळत आहे. मदत आणि पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही लॉकडाऊन वाढवला
जावू शकतो, असे माध्यमांना सांगितले.
मोफत लसीकरणावर होणार शिक्कामोर्तब
राज्यात १ मे पासून १८ वर्षांवरील
सर्वांचे कोविड लसीकरण सुरू केले जाणार आहे. या लसीकरणाची तयारी सध्या सुरू आहे. हे लसीकरण मोफत
करण्यात येणार असे संकेत आधीच मिळाले असून याबाबतच्या प्रस्तावावर आपण सही
केल्याचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. हा प्रस्ताव उद्या मंत्रिमंडळ बैठकीत
ठेवला जाणार आहे. सर्वांच्या विचारांती त्याबाबत निर्णय होईल आणि त्याची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील, असेही अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.
0 टिप्पण्या