कोरोना लॉकडाऊन काळात सुमारे 125 कुटुंबीयांना किराणा सामानाचे वाटप
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर - शहरात कोरोनाचा दिवसेंदिवस उद्रेक होत असून, लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत शहरात अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांचे हातावर पोट आहे. अशा कुटुंबीयांचे लॉकडाऊनमध्ये खूपच हाल होताहेत. सर्व दुकाने, कामधंदे व रोजगार बंद आहे. त्यामुळेच समाजातील अशा घटकांना मदत करण्यासाठी नगर जल्लोष ट्रस्ट, श्री साई द्वारका ट्रस्ट व उडान फाउंडेशन परिवार यांनी पुढाकार घेतला.
त्यांनी शहरातील माळीवाडा, शिवाजीनगर, नालेगाव, दातरंगे मळा, तोफखाना, मोचीगल्ली, सर्जेपुरा, पाईपलाइन रोड, नित्यसेवा, एमआयडीसी
अशा विविध परिसरातील सुमारे 125पेक्षा अधिक कुटुंबीयांना किराणा सामानाचे वाटप केले. यासाठी तयार करण्यात आलेल्या पिशवीत तांदूळ, गहू, साखर, तुरडाळ, तेल पिशवी, मसाले, तिखट, चहापावडर व बिस्किटे अशा वस्तू आहेत. या प्रेरणादायी उपक्रमाचा प्रारंभ श्री साई द्वारका सेवा ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय जाधव, उडान फाउंडेशनचे जितेंद्र तोरणे, राहुल सप्रे, श्री साई फायरचे राकेश केंदूरकर, शेखर कोडम, नगर जल्लोष ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा यांच्या हस्ते शिवाजीनगर येथे राहत असलेल्या तृतीयपंथीयांना देऊन करण्यात आला. नित्यसेवा, पाईपलाईन रोड येथे ‘पेशवाई श्रीमंत’ या वस्त्र दालनाचे व्यवस्थापक प्रशांत बल्लाळ व सामाजिक कार्यकर्ते स्तिमित राशीनकर यांच्या हस्ते किराणा सामान पिशवीचे वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अजय म्याना, सचिन बोगा, दीपक गुंडू, राकेश बोगा, भास्कर सुंकी उपस्थित होते.
यावेळी बोलताना धनंजय जाधव म्हणाले की, समाजातील गोरगरीब घटकांबरोबरच तृतीयपंथीयांसह अनेकांची रोजीरोटी बंद आहे. त्यामुळे अन्नावाचून हाल होत आहेत. त्यांची गरज काही अंशी पूर्ण व्हावी, यासाठी आम्ही सर्वांनी पुढाकार घेत हा उपक्रम राबविला. प्रत्येकाने सामाजिक भान जपल्यास कोणालाही उपाशीपोटी राहण्याची वेळ येणार नाही. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही गरज पूर्ण केली जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
जितेंद्र तोरणे म्हणाले की, कोरोना नियमांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक असून, रुग्णसंख्या वाढण्यास प्रत्येकजण जबाबदार आहे. प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन केलेच पाहिजे. या प्रेरणादायी उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरीबांना जगण्यासाठीच्या गरजेच्या वस्तुंची मदत करण्याबरोबरच त्यांना आधार देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
सागर बोगा यांनी या उपक्रमासाठी मदत करणार्यांप्रती आदराची भावना व्यक्त करून गोरगरीबांना आधार देण्याचे हे काम सातत्याने सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. हा उपक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष रत्नाकर श्रीपत, संतोष दरांगे, अक्षय अंबेकर, सुनील मानकर, गणेश साळी, रोहित लोहार, नीलेश मिसाळ, योगेश म्याकल, प्रशांत भंडारी, विकास जाधव, विराज म्याना, ज्ञानेश्वर भगत, राहुल आडेप, अक्षय हराळे, अमोल तांबे, राजेंद्र निफाडकर, इरफान शेख, आदित्य फाटक, अक्षय धाडगे, प्रशांत विधाते, अभिजीत ताठे, अजय दिवटे, रोहित चिपोळे यांनी परिश्रम घेतले
0 टिप्पण्या