लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : सराफ व्यासायिक आणि
ग्राहकांसाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या खरेदीवर आज
मंगळवारी लॉकडाउनमुळे पाणी फेरले आहे. आज मुंबई, जळगाव यासह
महत्वाच्या सराफा बाजारपेठामध्ये 'लॉकडाउन'मुळे शुकशुकाट दिसून आला. सोन्याच्या किमतीत अलीकडे घसरण झाली असली तरी
ग्राहकांनादेखील लॉकडाउनमुळे सोने खरेदीपासून वंचित रहावे लागले.
करोना रोखण्यासाठी ३०
एप्रिलपर्यंत राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.
यानुसार सराफ व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. आज गुढी पाडव्याच्या
मुहूर्ताला दुकाने बंद राहिल्याने सराफा व्यवसायिकांना मोठा झटका बसला आहे. सलग
दुसऱ्या वर्षी करोना संकट आणि लॉकडाउनमुळे गुढीपाडवा ज्वेलरी उद्योगासाठी कोरडा
गेला.
सराफ
व्यावसायिक आणि दागिने उद्योगाला सलग दुसऱ्या वर्षी गुढी पाडव्याला दुकाने बंद
ठेवावी लागली आहेत. मुंबईत यामुळे किमान ५०० कोटींचे नुकसान झाल्याची भीती इंडिया
बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष कुमार जैन यांनी व्यक्त
केली. जैन म्हणाले की, सरकारने गुढी पाड्वा लक्षात घेऊन सराफा
व्यवसायिकांना दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देणे आवश्यक होते.लॉकडाउनमधून सराफा
व्यावसायिकांना गुढीपाडव्यासाठी वेगळा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावर
कोणताही निर्णय झाला नाही, अशी खंत जैन यांनी व्यक्त केली.
त्यामुळे राज्यातील हजारो ज्वेलर्सला आज सणासुदीच्या हंगामात दुकान बंद ठेवावे
लागले, असे त्यांनी सांगितले.
गुढीपाडवा आणि लग्नसराईचा हंगाम असल्याने
ग्राहक या दिवशी सोने खरेदी करत असतो. करोना संकटात सोने ५६ हजार ३०० रुपयांच्या
विक्रमी स्तरावर गेले होते. मात्र मागील सहा महिन्यात सोने दरात मोठी घसरण झाली.
जवळपास १० हजारांनी सोने स्वस्त असल्याने यंदा गुढी पाडव्याला विक्री वाढेल, असा आशावाद बड्या सराफांनी व्यक्त केला
होता. मात्र लॉकडाउनमुळे या अपेक्षांवर पाणी फेरले.
राज्यभरात
सराफा दालने बंद आहेत. त्यामुळे ग्राहकांचा देखील हिरमोड झाला आहे. आता सराफ
व्यवसायिक अक्षय्य तृतीयेकडे डोळे लावून बसले आहेत. करोना रोखण्यासाठी सरसकट कठोर
लॉकडाउन लावण्याची मागणी सराफा व्यवसायिकांनी केली आहे. केवळ निवडक उद्योगांना
लॉकडाउनचे निर्बंध लावून सरकार या उद्योगांचे नुकसान करत असल्याचे सराफांच्या
संघटनांचे म्हणणे आहे.
0 टिप्पण्या