लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
काठमांडू: जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाच्या संसर्गाने जोर
धरला आहे. जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवरही करोनाचा संसर्ग
पोहचला आहे. नॉर्वेतील गिर्यारोहक एर्लेंड नेस्स याला करोनाची बाधा झाली असल्याचे
समोर आले आहे. त्याच्यासह एक शेर्पाही करोनाबाधित आहे.
नेस्सने सांगितले की, लवकरात लवकर शिखर गाठण्याचा आमचा
प्रयत्न होता. जेणेकरून आम्हाला करोनाची बाधा होणार नाही. काठमांडूतील एका
रुग्णालयाने एव्हरेस्टवरून काही करोनबाधित उपचारासाठी दाखल झाले असल्याचे
सांगितले. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची आकडेवारी व इतर
माहिती दिली नाही.
दरम्यान, नेपाळच्या पर्यटन विभागाच्या प्रवक्त्या मीरा आचार्य यांनी सांगितले की,
आतापर्यंत कोणत्याही गिर्यारोहकाला करोनाची लागण झाल्याचा वैद्यकीय
अहवाल मिळाला नाही. एका व्यक्तिला १५ एप्रिल रोजी तेथून आणण्यात आले होते. मात्र,
त्याला न्यूमोनियाची लागण झाली असल्याचे सांगण्यात आले होते. त्याला
आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. नेपाळने यावर्षी एव्हरेस्टवर चढाई
करण्यासाठी ३७७ परमिट दिले होते. वर्ष २०१९ मध्ये ३८१ परमिट देण्यात आले होते.
यंदा ही संख्या वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. मागील काही वर्षांपासून एव्हरेस्टवर
चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गर्दी वाढत आहे. वर्ष
२०१९ मध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातील चौघांचा मृत्यू गर्दीमुळे झाला
असल्याचे म्हटले जाते.
0 टिप्पण्या