Ticker

6/Breaking/ticker-posts

रेमडेसिवीरचा काळाबाजार: ‘ आयएमए’ संघटनेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:- रेमडेसिवीर इंजक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी अनेक कडक निर्बंध करण्यात आले. राज्यात ठिकठिकाणी कारवाईही झाली. तरीही हे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे आता डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. नातेवाईकांनी आणलेल्या इंजेक्शनसोबत अधिकृत बिल असल्याशिवाय त्या इंजेक्शनचा रुग्णावर वापर करायचा नाही, असा निर्णय आयएमएच्या नगर शाखेने घेतला असून राज्यभरात अशीच पद्धत सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आय एम एच्या नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे व सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी ही माहिती दिली. या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणही त्यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘सध्या रेमडेसिवीर व टोसिलीझूमॅब या औषधांचा काळाबाजार सुरु झाला आहे. अवाजवी रक्कम घेऊन ही औषधे बाजारात मिळतात. सरकारचे कडक निर्बंध असूनही औषधे मिळतात कशी? याची तातडीने चौकशी करुन काळाबाजार करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. डॉक्टरांना ही इंजेक्शन्स मिळत नाहीत परंतु रुग्णांचे नातेवाईक ही इंजेक्शन्स घेऊन येतात. याचा तपास संबंधित अधिकार्‍यांनी करावा. जिल्ह्यात येणारा सर्व साठा व पुरवठा हा जिल्हाधिकारी व औषध निरीक्षक यांच्यामार्फत फक्त कोविड केअर सेंटरला होत असेल तर मग ही इंजेक्शन्स बाहेर कशी मिळतात?’


यातील धोका लक्षात आणून देताना आयएमएने म्हटले आही की, ‘काही ठिकाणी तर मूळ औषधाऐवजी त्यामध्ये पाणी किंवा स्टीरॉइड भरून विकण्याचे उद्योग सुरु आहेत. प्रशासनाने अशा बोगस इंजेक्शनची विक्री करणार्‍यांचे रॅकेट पकडले आहे. रेमडेसिवीरऐवजी दुसरेच औषधे भरलेली इंजेक्शन रुग्णांना दिल्यास त्याच्या जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे अधिकृत बिलांशिवाय आणलेली ही इंजेक्शन हे रुग्णांना देण्याचा धोका डॉक्टर पत्करू शकत नाहीत. म्हणून इंजेक्शनचे अधिकृत बिल असल्याशिवाय कोणत्याही कोविड सेंटरने ही इंजेक्शन स्वीकारू नयेत, असा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व कोविड सेंटर व रुग्णालयांनी अशा प्रकारचे पाऊल उचलल्यास या काळ्या बाजारास आळा बसू शकेल,’ असे आवाहन करण्यात आले आहे.


या औषधाच्या परिणामकारकेतबद्दल म्हटले आहे की, ‘आय.सी.एम.आर.ने दिलेल्या निष्कर्षामधे रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोविड रुग्णाला फारसे परिणामकारक नाही. ते मोजक्याच रुग्णांना संसर्गाच्या नऊ दिवसांच्या आत दिल्यास थोडेसे परिणामकारक ठरते. इंडियन मेडिकल असोसिएशनचे कोणतेही सभासद डॉक्टर्स रुग्णाच्या नातेवाईकाला ही इंजेक्शन बाहेरून आणण्यासाठी प्रिस्क्रिपशन्स देत नाहीत,’ असेही त्यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या