लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
लंडन: करोनाच्या लशीच्या परिणामकतेबाबत, त्याच्या दुष्परिणांमाबाबत चर्चा
सुरू आहे. तर, दुसरीकडे करोना प्रतिबंधक लशीचा एक डोस
घेतल्याने संसर्गाचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले असल्याचे समोर आले आहे. पब्लिक
हेल्थ इंग्लंडच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. ऑक्सफर्ड/अॅस्ट्राझेनेका किंवा
फायजर/बायोटेक या लशीचा एक डोस घेतल्यासही करोनाचा प्रसार ५० टक्क्यांपर्यंत कमी
झाल्याचे अभ्यासात आढळले आहे. ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेमार्फत
(एनएचएस) राबविल्या जाणाऱ्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत ज्या व्यक्तींना लशीचा एक
डोस देण्यात आला आणि ज्यांना तीन आठवड्यांच्या आत करोनाचा संसर्ग झाला होता,
त्यांच्याकडून लसीकरण न झालेल्या व्यक्तींमध्ये करोना विषाणूचा
प्रसार होण्याचे प्रमाण ३८ ते ४९ टक्के कमी होते, असे म्हटले
आहे. लसीकरणानंतर १४ दिवसांनंतरही करोनापासून संरक्षण मिळाल्याचे या अभ्यासात
आढळले. विशेष म्हणजे, वयोमानानुसार किंवा संपर्कातील
व्यक्तीनुसार या संरक्षणाच्या प्रमाणामध्ये फरक आढळला नाही.
ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅन्कॉक यांनी सांगितले
की, या नव्या अभ्यासानुसार,
लशीचा एक डोस कुटुंबातील करोनाप्रसाराचा धोका ५० टक्क्यांपर्यंत कमी
करते. त्यामुळे लसीकरण तुमचे आणि तुमच्या कुटुंबीयांचे संरक्षण करते, हे पुन्हा सिद्ध झाले असून लस घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या नव्या अभ्यासाची तज्ज्ञांकडून सखोल चिकित्सा
अद्याप पूर्ण झालेली नाही. या अभ्यासासाठी करोनाबाधित परंतु लसीकरण झालेल्या अशा
२४ हजार घरांमधील ५७ हजारांहून अधिक लोकांशी संपर्क साधण्यात आला होता. या
व्यक्तींची तुलना लसीकरण न झालेल्या सुमारे १० लाख नागरिकांशी केली गेली. अभ्यासात
सहभागी बहुतांश व्यक्ती ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या. याआधी केलेल्या
अभ्यासानुसार, दोन्हीपैकी
कोणत्याही एका लशीची मात्रा घेतल्यानंतर चार आठवड्यांनंतर करोनाचा संसर्ग होण्याची
शक्यता ६० ते ६५ टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचे आढळले आहे.
0 टिप्पण्या