Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्रात उद्या रात्री ८ वाजल्यापासून १५ दिवस संचारबंदी; निर्बंध आणखी कडक

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा संचारबंदी व कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे  यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संचारबंदीची घोषणा केली. ही संचारबंदी १५ दिवसांसाठी असेल व उद्या (बुधवारी) १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून त्यांची अंमलबजावणी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ही घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी ५ हजार ४०० कोटींचे आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे
राज्यात करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. आधीच्या लाटेपेक्षा करोनाची दुसरी लाट अधिक भीषण असल्याचेही स्पष्ट चित्र दिसत आहे. राज्यात गेले काही दिवस दररोज ५० हजारांवर नवीन रुग्णांची भर पडत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांत उपचारांसाठी जंबो सुविधा निर्माण करण्यात आल्या असतानाही त्या अपुऱ्या पडू लागल्या आहेत. ही स्थिती लक्षात घेता करोना संसर्गाची साखळी तोडण्याची नितांत आवश्यकता आहे व त्यासाठीच कडक निर्बंध व संचारबंदीचे पाऊल मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी उचलले आहे. राज्यात उद्या रात्री ८ वाजल्यापासून कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. १ मेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. संचारबंदी व कडक निर्बंध जाहीर करतानाच अनेक महत्त्वाच्या घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्या घटकांना त्यात आर्थिक दिलासा देण्यात आला आहे.

करोनाविरुद्धची लढाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आताची लढाई अधिक आव्हानात्मक आहे. मात्र ही लढाई आपल्याला जिंकावीच लागेल, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. एमपीएससी तसेच दहावी व बारावीच्या परीक्षा आम्ही पुढे ढकलल्या आहेत. मात्र करोनाची परीक्षा आपण पुढे ढकलू शकत नाही. ती परीक्षा आपल्याला उत्तीर्ण व्हावीच लागेल. त्यासाठी मी गेल्या काही दिवसांपासून समाजातील प्रत्येक घटकाशी चर्चा करत आहे. त्यांच्याशी संवाद साधला. एकमत करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यात अनेक मतप्रवाह आहेत. मात्र मतमतांतरे किती काळ चालणार हा प्रश्न असून आता वेळ दवडून चालणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले.

राज्यात आपण मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उभ्या केल्या आहेत. मात्र, त्या सुविधाही आज कमी पडत आहेत. राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ऑक्सिजनची आणखी गरज भासणार आहे. त्याबाबत केंद्र सरकारकडे आम्ही मागणी केली आहे. त्यांनी जे पर्याय दिले आहेत तिथून ऑक्सिजन महाराष्ट्रात आणणे खर्चिक आणि वेळखावू आहे. त्यामुळे हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे व तशी मागणी आपण पंतप्रधानांकडे करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे 

1. 100 टक्के ऑक्सिजनचा उपयोग वैद्यकीय कारणांसाठी होणार. सध्या महाराष्ट्रात 950-1000 टन ऑक्सिजनचं उत्पन्न होतं.

2. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील इतर राज्यांमधूनही ऑक्सिजन आणण्याची परवानगी दिली. रस्त्याने ऑक्सिजन आणताना लष्कराच्या, वायू दलाच्या मदतीने हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी परवानगी द्यावी आणि व्यवस्था करावी अशी मागणी पंतप्रधानांकडे करणार आहे.

3. मार्चमध्ये जीएसटीची मर्यादा असते ती आणखी 3 महिन्यांनी वाढवण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार. उद्योगधंदे राहिले पाहिजे, तरच रोजीरोटी राहिल.

4. या काळात रोजीरोटी गेली त्यांना व्यक्तिगत मदत करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार.

5. रेमडेसिव्हिर इंजेक्शन कमी पडू देणार नाही.

6. रुग्णवाढ भयावह आहे. ऑक्सिजनचा खूप उपयोग करावा लागतोय कारण रुग्ण वाढलेत. त्यामुळे ऑक्सिजन तुटवडा होतोय.

7. नव्याने उत्तीर्ण होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना उपचाराच्या कामात सहभागी होण्याचं आवाहन. निवृत्त डॉक्टरांनीही या लढाईत सहभागी व्हावं.

8. एकदम लॉकडाऊन लावणार नाही, पण त्यासारखे काही निर्बंध लावावे लागतील. बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार. याला केवळ पंढरपूर-मंगळवेढा काही दिवसांसाठी अपवाद असेल.

9. 14 एप्रिल सायंकाळपासून राज्यभरात ब्रेक द चेन अंतर्गत कलम 144 लागू करत संचारबंदी होणार. अनावश्यक प्रवास बंद करावा लागणार. योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

10. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा चालू असतील. लोकल आणि बससेवा बंद करणार नाही. जीवनावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी व्यवस्था ठेवणार.



लॉकडाऊनचं भय : महाराष्ट्र, दिल्लीतून घरी परतण्यासाठी मजुरांची रेल्वे स्टेशनवर उसळ्ली गर्दी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या