लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई: गेल्या 36 दिवसांत महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना
राजीनामे द्यावे लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण विरोधी पक्षाच्या
हातात गेले आहे का, अशी शंका येत असल्याचे वक्तव्य शिवसेना
खासदार संजय राऊत यांनी
केले आहे. ठाकरे सरकारने आतातरी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर द्यायला
पाहिजे. अन्यथा विरोधी पक्षांचा खोटेपणा रोज ऐकून लोकांना एक दिवस खरा वाटू लागेल.
सरकारचे चारित्र्य हे शेवटी राज्याचे किंवा देशाचे चारित्र्य असते, असे राऊत यांनी सांगितले.
‘ सामना ’तील रोखठोक या सदरात
संजय राऊत यांनी हे विचार मांडले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात 14 मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले. पण तेव्हा नैतिकतेने सत्तेशी जणू लव्ह जिहाद
पुकारला होता. मात्र, सध्याच्या घडीला विरोधी पक्ष सरकारची
प्रतिमा बिघडवण्याची एकही संधी सोडत नाही, असे राऊत यांनी
म्हटले आहे.
‘शपथ
घेतल्यापासून महाविकासआघाडी सरकार सापाला दूध पाजतंय’
संजय राऊत यांनी शासकीय महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या
नियुक्तीवरून सरकारचे कान उपटले आहेत. राज्यपालांनी अद्याप 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्त्या केल्या नाहीत, ही
बाब खरी आहे. पण दीड वर्ष उलटूनही सरकारने शासकीय महामंडळांचे अध्यक्ष आणि
सदस्यपदी तज्ज्ञ आणि आपापल्या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केलेल्या नाहीत,
याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
यासाठी त्यांनी निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या वक्तव्याचा
दाखला दिला आहे. शपथ घेतल्या दिवसापासून आघाडी सरकार सापाला दूध पाजतंय. आम्ही
सांगून थकलो. आजपर्यंत कायदा विभागातील एक साधा वकील बदललेला नाही. एक नोकर दोन
तत्वत: मतभिन्नता असलेल्या मालकाची प्रामाणिकपणे सेवा कशी करु शकतो?, असा प्रश्न कोळसे-पाटलांना पडला असेल तर सरकारने त्याचे समाधान करायला हवे,
असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.
वळसे-पाटील
पॅटर्नने झाडाझडती घ्या: संजय राऊत
संजय राऊत यांनी नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या
भूमिकेचे समर्थन केले. वळसे-पाटलांनी गृहखात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्याच
दिवशी म्हटले होते की, पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्ठा नक्की कोठे आहेत,
हे तपासून घ्यावे लागेल. हे फक्त विधी, न्याय
आणि गृहखात्यापुरते नाही, तर संपूर्ण प्रशासनाचीच ‘वळसे-पाटील’ पॅटर्नने झाडाझडती होणे गरजेचे आहे,
असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.
0 टिप्पण्या