लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
)
मुंबईः अनिल देशमुख यांनी
गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत या
मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केलं आहे. तसंच, माझ्यासाठी अनिल
देशमुख हा मुद्दा महत्त्वाचा नाही, असंही ते म्हणाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
पत्रकार परिषद घेत राज्यातील करोना परिस्थिती व परमबीर सिंह यांचं पत्र व अनिल
देशमुख यांचा राजीनामा यावर भाष्य केलं आहे. ' मुकेश अंबानी
यांच्या घरासमोर पोलिसांनी स्फोटकं ठेवली, ती कोणी आणि
कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली आणि का ठेवली हा मुद्दा महत्त्वाचा आहे. अनिल देशमुख
हा मुद्दा महत्त्वाचा नाही. माझी विनंती आहे की मुळ मुद्दा भरकटू देऊ नका,'
असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
' परमबीर सिंह यांना
१०० कोटींच्या टार्गेटची आठवण पोलीस कमिशनर पदावरुन हटवलं गेल्यावरच का झाली?
आधी का नाही झाली?, असा सवालही राज यांनी
उपस्थित केला आहे. तसंच, बार आणि रेस्टोरंटकडून १०० कोटींचं
टार्गेट अनिल देशमुखांकडून दिलं गेलं हा आरोप लांच्छनास्पद आहे,' असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, 'मनसे पदधिकारी जमील शेख यांच्या हत्या प्रकरणात
राष्ट्रवादीचा पदधिकारी नजीम मुल्ला यांचं नाव आलं आहे. याच पदाधिकाऱ्यांचं नाव
सुरज परमार हत्या प्रकरणातही आलं होतं. या प्रकरणी राज्य सरकारने लक्ष घालावं,'
अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
शरद पवारांची भेट घेणार
'राष्ट्रवादीच्या नजीम मुल्लाचं नाव
आल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवार ह्यांनीही ह्या प्रकरणाची दखल घ्यावी.
असे राजरोसपणे खून पडायला लागले तर ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं
नाही. ह्यासंबंधी मी पवारसाहेबांची भेट घेणार आहे,' अशी
माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.
0 टिप्पण्या