Ticker

6/Breaking/ticker-posts

वनविभाग पदभरती: वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबईः वनविभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या संवर्गातील पदांवर वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवीधारकांसाठी राखीव जागा ठेवण्याच्या अनुषंगाने तातडीने प्रस्ताव शासनास सादर करावेत, असे निर्देश वने व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अलीकडेच दिले. यामुळे वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यानुसार वनशास्त्र पदवीधारकांना वनरक्षक गट-क पदासाठी ५ टक्के आरक्षणाची तर सहायक वनसंरक्षक, गट अ (कनिष्ठ श्रेणी) या पदासाठी १० टक्के आरक्षणाची नव्याने तरतूद करण्यासह वनक्षेत्रपाल गट-ब संवर्गातील पदांसाठी ५ टक्क्याऐवजी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्याचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वन विभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल आणि वनरक्षक या संवर्गातील पदभरतीच्या शैक्षणिक अर्हतेसंदर्भात सुधारणा करण्याच्या अनुषंगाने राज्यमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. महाराष्ट्र वन सेवेतील पदांच्या सरळसेवा भरतीमध्ये वनशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवीधारकांना प्राधान्य मिळण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने राज्य शासनास शिफारस करण्यासाठी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारसींची माहिती यावेळी भरणे यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.

राज्यात सध्या वनरक्षकांची शैक्षणिक अर्हता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) उत्तीर्ण अशी असली तरी यामध्ये विज्ञान, अभियांत्रिकी व इतर विषयातील पदवीधर देखील भाग घेतात व त्यांची निवडही होते. तरी वनरक्षक संवर्गाकरिता होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत भाग घेण्यासाठी इच्छूक वनशास्त्र पदवीधारकांकरिता ५ टक्के आरक्षण ठेवण्यात यावे. परंतु योग्य वनशास्त्र पदवीधारक उमेदवार न मिळाल्यास सदरची पदे सर्वसाधारण उमेदवारांमधून भरता येतील अशी शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (प्रशासन दुय्यम संवर्ग) यांनी पुढील १० दिवसामध्ये या पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव शासनास सादर करावा, असे निर्देश भरणे यांनी दिले.

वनक्षेत्रपाल गट-ब संवर्गात पदभरतीमध्ये वनशास्त्र पदवीधारक यांच्यासाठी सध्या असलेल्या ५ टक्के आरक्षणामध्ये वाढ करून १० टक्के करण्यात यावे. परंतु योग्य वनशास्त्र पदवीधारक उमेदवार न मिळाल्यास सदरची पदे सर्वसाधारण उमेदवारांमधून भरता येतील. त्याअनुषंगाने सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्याबाबत पुढील आठ दिवसामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात यावा.

तसेच सहायक वनसंरक्षक गट-अ संवर्गात पदभरतीमध्ये वनशास्त्र पदवीधारकांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात यावी. परंतु योग्य वनशास्त्र पदविधारक उमेदवार न मिळाल्यास सदरची पदे सर्वसाधारण उमेदवारांमधून भरता येतील. या प्रस्तावास सामान्य प्रशासन विभागाची मान्यता प्राप्त झाली असून पुढील आठ दिवसामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेस्तव प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही भरणे यांनी यावेळी दिले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या